मुंबईवर चिंतेचे ढग ; धरण क्षेत्रात फक्त २२ टक्के पाणीसाठा

सिंचन विभागाच्या शिफारशीवर राज्य सरकार पुढील १५ दिवसांत निर्णय घेईल, असे अपेक्षित आहे
मुंबईवर चिंतेचे ढग ; धरण क्षेत्रात फक्त २२ टक्के पाणीसाठा

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात ८ मेपर्यंत फक्त २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीबाणीची परिस्थिती ओढावू नये, यासाठी अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी शिफारस कोकण सिंचन विभागाने राज्य सरकारला केली आहे. सिंचन विभागाच्या शिफारशीवर राज्य सरकार पुढील १५ दिवसांत निर्णय घेईल, असे अपेक्षित आहे. या दोन्ही धरणांतील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईकरांची रोजची तहान भागवली जाते. मुंबईकरांची रोजची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो, मात्र सध्या सातही धरणांत फक्त २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारला अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे.

सात धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

८ मे २०२३ पर्यंत उपलब्ध पाणीसाठा

अप्पर वैतरणा - ४१,५३३

मोडक सागर - ३७,८३८

तानसा - ४९,३८७

मध्य वैतरणा - २८,७६८

भातसा - १ लाख ४५ हजार ३४३

विहार - १०,२६३

तुळशी - ३,१२५

तीन वर्षांतील पाणीसाठा, (दशलक्ष लिटर) ( टक्क्यांत)

२०२३ - ३,१६,२५७ - २१.८५

२०२२ - ३,६९,२३५ - २५.५१

२०२१ - ३,०७,९८१ - २१.२८

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in