

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांसोबत ठाण्यात गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी फेटाळून लावले. मागील दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी वावड्या उठवल्या जात असल्याचा खुलासा शिंदे यांनी केला.
ठाकरे गटाचे खासदार-आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यात बुधवारी शिंदे यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेलती. या बैठकीला ठाकरे गटाचे ९ पैकी आठ खासदार उपस्थित होते. ही बैठक सकाळपर्यंत रंगल्याचे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाच्या खासदारांकडून लगेच खुलासा करण्यात आला. काहीही झाले तरी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, अशा आणाभाका त्यांनी घेतल्या.
शिंदेंसोबतच्या कथित बैठकीला अनिल देसाई वगळता खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित असल्याचे वृत्त पसरले. यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, त्यांच्याकडून तत्काळ खुलासा आल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा खुलासा करण्यात आला.
अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे, असे शिंदे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत - विजय वडेट्टीवार
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीबाबत मीही ऐकले आहे. हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काही राहिलेली नाही. कोणी कुठेही जावे, कोणाच्याही मांडीवर बसावे, डोक्यावर घ्यावे आणि मग पायाखाली तुडवावे, अशी राजकारणाची परिस्थिती झाल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे कोणतेही ऑपरेशन नाही : गिरीश महाजन
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोणीही आमदार किंवा खासदार राहण्यास इच्छुक नाही. हे लोकप्रतिनिधी अन्य पक्षात जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची संधी त्यांचे विरोधक सोडणार नाहीत. मात्र, सध्या भाजपचे कोणतेही ‘ऑपरेशन लोटस’ सुरू नाही. शिवसेना शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन’चे काय ते आगामी काळात स्पष्ट होईल. असे काही होणार असेल तर सगळ्यांसमोर येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.