

मुंबई : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना, ‘मी कोणतेही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही. ऑपरेशन यशस्वी झाले असून तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल, असा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ऑपरेशन यशस्वी ठरले असून रुग्ण सुदृढ असल्याची कोटी यावेळी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाय ब्रेकवर होता. सर्व योजनांना स्थगिती होती. त्यामुळे २०२२ मध्ये सरकार बदलले नसते तर महाराष्ट्र २० ते २५ वर्ष मागे गेला असता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. अमेरिका - इराण युद्ध थांबले पण विरोधकांचा बहिष्कार थांबत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि विविध निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले यश हे सरकारच्या कामगिरीचे फलित आहे. विधान परिषद निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार मागे हटल्याचे चित्र दिसले. त्यामुळे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.