Operation Tiger : यावेळचा मुहूर्त का हुकला?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गुपचूप ऑपरेशन टायगर घडवून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची सर्व तयारी केली होती. मात्र दिल्लीतील घडामोडींची बातमी फुटली किंवा फोडली गेल्याने शिंदे यांच्या ऑपरेशनमध्ये अडथळे आले. आता शुक्रवारी १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनी ऑपरेशन टायगरच्या यशस्वीतेबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जाते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गुपचूप ऑपरेशन टायगर घडवून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची सर्व तयारी केली होती. मात्र दिल्लीतील घडामोडींची बातमी फुटली किंवा फोडली गेल्याने शिंदे यांच्या ऑपरेशनमध्ये अडथळे आले. आता शुक्रवारी १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनी ऑपरेशन टायगरच्या यशस्वीतेबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जाते.

शिंदे यांचे ऑपरेशन टायगरचे मुहूर्त अनेकदा हुकल्याने गेल्या काही दिवसांत ते काहीसा थट्टेचा विषय झाले होते. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांना भेट न दिल्याने तर शिंदे हे दिल्लीच्या मर्जीतून उतरल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अर्थात दोन दिवसांनंतर शिंदे यांची शहा यांच्यासोबत भेट झाली. विधान परिषदेच्या उमेदवाऱ्यांमध्ये शिंदे यांना पडती भूमिका घ्यावी लागली. महापालिका निवडणुकांच्यावेळी मुंबईत भाजपच्या घशात हात घालून आपल्याला हव्या तेवढ्या जागा शिंदे यांनी काढून घेतल्या होत्या. मुंबईत ठाकरे शिरजोर ठरल्याने शिंदे यांचे ते महत्व उतरणीला लागल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली तेव्हाच ऑपरेशन टायगरच्या बातम्यांनी वाहिन्यांच्या स्क्रीनचा ताबा घेतला. सोमवारी चर्चेत राहिलेल्या ऑपरेशन टायगरचा धुरळा मंगळवारी खाली बसला. मंगळवारी रात्री शिंदे खासगी विमानाने दिल्लीत दाखल झाले तेव्हा रात्री १२ वाजता दिल्लीतील मीडिया त्यांच्या स्वागताकरिता हजर होता. शिंदे यांना आपल्या दौऱ्याबाबत गोपनीयता राखायची असल्याने त्यांना धक्का बसला. खासगी विमानात शिंदे व त्यांचे खासगी सचिव प्रभाकर काळे हेच होते. त्यांनी आपले खासगी विमान उडवले आणि शिंदे जयपूरला गेले. मध्यरात्री दोन वाजता शिंदे पुन्हा त्याच विमानाने दिल्लीत आले. तोपर्यंत मीडिया घरी गेला होता.

दिल्लीतील खा. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी नेहमी मुक्काम करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी दिल्लीतील हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. शिंदे रात्रभर महाराष्ट्रातील नांदेड, पुणे येथून उद्धवसेनेच्या खासदारांना घेण्याकरिता गेलेल्या खासगी विमानांच्या दिल्लीतील आगमनावर लक्ष ठेवून होते. खासदारांना घ्यायला खासगी विमाने गेल्याच्या बातम्याही मीडियाच्या कानावर गेल्या किंवा जातील, असा बंदोबस्त केला गेला. बुधवारी सकाळी ऑपरेशन टायगर हीच मुख्य बातमी होती. आतापर्यंत जेव्हा जेव्हा दिल्लीत आले तेव्हा शिंदे हे मुद्दाम मीडियाला भेटत होते. मात्र बुधवारी दिवसभर शिंदे कुठे होते व कुणाला भेटले, याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. दिल्लीतील माध्यम प्रतिनिधी शिंदे यांना शोधत होते. दुपारी तीन वाजता अचानक दिल्लीत बातमी पसरली की, शिंदे मुंबईला रवाना झाले. त्याला शिंदेंच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला. उद्धवसेनेच्या सहा खासदारांपैकी दोघांच्या पत्रावर सह्या नाही. मुंबईतील एका खासदाराला पुन्हा उमेदवारीचे आश्वासन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुखातून ऐकायचे आहे. कारण मिहीर कोटेजा यांना तेथून उमेदवारी मिळण्याची भीती त्याला वाटते तर अन्य एका खासदाराचा निर्णय कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. त्याखेरीज तो पत्रावर सही करायला तयार नाही, अशा बातम्या पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. लोकसभा अध्यक्षांना खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र बुधवारी दिल्याचे सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. आता १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरे आपले किती खासदार हजर करतात आणि शिंदे ठाकरेंचे किती खासदार हजर करण्यात यशस्वी होतात यावरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की हाणून पडले किंवा पाडले गेले ते स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in