विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सत्ताधाऱ्यांचीही आक्रमक रणनीती

या बैठकीत चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे पत्रही महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सत्ताधाऱ्यांचीही आक्रमक रणनीती

मुंबई : सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. न्यायालयात न टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हे सरकार घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे आहे. पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. राज्याला उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नसल्याचे सांगत सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

सोमवारपासून राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. अधिवशेनाच्या पूर्व संध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे पत्रही महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळातील काँगेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे अनिल देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

मराठा-ओबीसी, एनटी (धनगर)-एसटी(आदिवासी), दलित-सवर्ण, हिंदू-मुस्लीम यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण केले गेले. याला सरकारचा आशिर्वाद आह. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र नांदत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी या समाजात भांडणे लावण्याचा उद्योग सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेपरफुटी प्रकरणे एकामागून एक समोर येत आहे. परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. युवकांच्या आशा धुळीला मिळवणाऱ्या या सरकारचे चहापान घेणे म्हणजे युवकांचा अपमान होईल, त्यामुळे या चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयाता रिल बनवतात. पुण्यात २०० गुंडांची परेड होते त्यानंतर पुण्यात २ हजार कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलीसांना गुंड जुमानत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करू राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनी विषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करत आहे.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यांच्या पापात आम्ही सहभागी होणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in