तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा सभात्याग ;प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक

तानाजी सावंत यांनी गडचिरोली येथील महिलांचा मृत्यू हा जंतू संसर्गामुळे झाल्याचे सांगत विभागीय चौकशीत डॉक्टर आणि कर्मचारी दोषी आढळले नसल्याचे सांगितले.
तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा सभात्याग ;प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक
PM

नागपूर : गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुती दरम्यान झालेल्या महिलांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बुधवारी विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. याशिवाय या प्रकरणातील जबाबदार डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी लावून धरली.

काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुती दरम्यान झालेल्या महिला मृत्यूप्रकरणी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी प्रसुतीदरम्यान झालेल्या महिला मृत्यूची विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल १५ दिवसात घेण्यात येईल, असे जाहीर केले. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्याबाब निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या या उत्तरावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतप्त झाले. आरोग्य खात्याची चौकशी हा फार्स आहे. आरोग्य मंत्री हे निविदा आणि रुग्णालयाच्या खासगीकरणात गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी घेऊन मंत्र्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी करत वडेट्टीवार यांनी सभात्यागाची घोषणा केली.

तत्पूर्वी तानाजी सावंत यांनी गडचिरोली येथील महिलांचा मृत्यू हा जंतू संसर्गामुळे झाल्याचे सांगत विभागीय चौकशीत डॉक्टर आणि कर्मचारी दोषी आढळले नसल्याचे सांगितले. तर बुलडाण्यातील महिलेचा मृत्यू हा डेंग्युमुळे झाला असून तिला योग्यवेळेत उपचार देण्यात आल्याने  डॉक्टरांवर कारवाई  करण्यास त्यांनी नकार दिला.याला भाजपच्या योगेश सागर आणि शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, सभागृहातील गोंधळ लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या स्तरावरील चौकशीचा अहवाल पुढील आठवड्यात मांडण्याचे निर्देश तानाजी सावंत यांना दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in