विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

शेतकरी संकटात असताना मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले देखील नाहीत. तर मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त होते, अशी टीकाही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
Published on

नागपूर: दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता मिचांग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आस्मानी संकटामुळे कापूस, धान, संत्रा, द्राक्ष, कांदा, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वच पिके हातची गेल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्या, अशी जोरदार मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. शेतकरी संकटात असताना मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले देखील नाहीत. तर मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त होते, अशी टीकाही त्यांनी केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विजय वडेट्टीवार यांनी नैसर्गिक संकटामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेत त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी करत सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने फक्त ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे याच तालुक्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, आम्ही मागणी केल्यानंतर सरकारने १ हजार २१ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. पण केंद्र सरकारकडे या दुष्काळी मंडळासाठी मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे या महसूली मंडळांना आर्थिक मदत मिळणार नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

राज्य सरकार दुष्काळ सदृश्य परिस्थिती असा नवीन शब्दप्रयोग करीत असून सरकारने मदतीसाठी हात वर केले आहेत. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण पंचनामे होत सुरू नाहीत. तसेच सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसत नसल्याचे सांगून फेटाळून लावला.

दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली

महाविकास आघाडीचे सरकार असताना नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत सरसकट कर्जमाफी दिली होती. सद्याच्या परिस्थितीत नैसर्गिक संकटाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहातील कामकाज बाजूला सारून उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

logo
marathi.freepressjournal.in