'माझी लाडकी बहीण' योजनेमुळं विरोधकांना पोटदुखी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार टीका

माझी लाडकी बहीण योजना विरोधकांना पचलेली नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : ‘महायुती’ सरकारने तयार केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. आमच्या योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांना पचलेली नाही. या योजनेला विरोध करणारे ‘माझ्या लाडक्या बहिणी’चे सावत्र भाऊ आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

ते म्हणाले की, माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नयेत, ही योजना सुरू होता कामा नये, यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. पण सरकार म्हणून आम्ही जेवढा पैसा लागेल तेवढा देऊ, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्ली येथे आले होते.

ते पुढे म्हणाले, “आम्ही कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे हटत नाही. आमच्याकडून ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली असे म्हणत नाही. चुनावी जुमला होता, असे म्हणत नाही. कारण आम्ही पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे.”

आमच्या सरकारने महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत प्रवासाची मुभा दिली, तेव्हा निवडणुका नव्हत्या. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, त्यांच्याविरोधात कोण आहे”, अशीही टीका शिंदे यांनी केली.

दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री शासकीय बैठकीसाठी आले असताना दोन्ही उपमुख्यमंत्रीही दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपावर काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागावाटप योग्यवेळी होईल. महायुतीने दोन वर्षांत जे काम केले आहे, त्यानुसार महायुतीला यश नक्की मिळेल.

शरद पवार यांनी विविध प्रश्नांसंबंधी माझी भेट घेतली होती. यावेळी आरक्षणासंबंधी आम्ही चर्चा केली. जाती-जातीवरून महाराष्ट्रात तणाव दिसत आहे. महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, इथे सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून बैठक घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in