विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

महिला सदस्यांनी न घाबरता, न डगमगता ठामपणे बोलले पाहिजे. सभागृहात त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत कोणी टीका केली, तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

मुंबई : आपण जे संविधान तयार केले आहे, त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. एखाद्या विषयाचा निषेध नोंदविण्यासाठी बऱ्याच वेळेला सभागृहात सदस्यांकडून कागद फेकण्यात येतात, बाक वाजविले जातात, अगदी आक्रमकपणे पीठासीन अधिकाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न केला जातो, अशावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी घाबरून न जाता, दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेतला पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्याला बऱ्याचदा कामकाज चालवणे अशक्य असते. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सभागृहात कामकाज सुरळीतपणे चालेल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

रविवार, २८ जानेवारी रोजी, विधानभवनात अखिल भारतीय पीठासीन अधिकारी यांच्या ८४ व्या परिषदेच्या कार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, बऱ्याचदा सभागृहात दोन सदस्यांमध्ये असभ्य भाषेत, एकेरीमध्ये मोठ्या आवाजात बोलले जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे. जेणेकरून सभागृहात शांततेच्या मार्गाने चर्चा व एकमेकांचा आदर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सर्वांनी एकत्रित येऊन विधिमंडळ कामकाजाच्या नियमांमध्ये असणाऱ्या असांसदीय शब्दांची फेररचना करून नवीन असांसदीय शब्दांचा त्यामध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

पिठासीन अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सभागृहाचे कामकाज चालवावे बऱ्याचदा विरोधी पक्षाकडून कामकाज बंद पडण्याचा निर्णय आधीच होताना दिसतो. तसे न होता पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद करून पुढील विषयावर सभागृहाचे कामकाज सुरू केले पाहिजे. महिला सदस्यांनी न घाबरता, न डगमगता ठामपणे बोलले पाहिजे. सभागृहात त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत कोणी टीका केली, तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपले मनोबल खचू न देता व डोळ्यात अश्रू न येऊ देता सभागृहात हिरिरीने सहभागी झाले पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहातील कामकाजाच्या वेळेचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे. सदस्यांनी देखील मोजक्या वेळेतच आपले म्हणणे मांडले पाहिजे. जेणेकरून सभागृहात जास्तीत जास्त काम करणे शक्य होईल आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in