
मुंबई : शक्तिपीठ महामार्गाच्या आड शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव आहे. सुमारे ८६ हजार कोटींचा प्रकल्प असल्याचे बोलले जाते. म्हणजे एका किमीच्या रस्त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
शक्तिपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापूर पुरता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकारमध्ये राहायचे आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी वेगवेगळी स्टेटमेंट करायची हे सरकारचे षडयंत्र असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.
३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण ताकदीने प्रश्न मांडू, आपापल्या जिल्ह्यातील आमदारांचे शक्तीविरोधातील पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात १२ मार्चला भव्य मोर्चा काढण्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखऊन देऊ. मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
ठाकरे गटाचे कोल्हापूर सह संपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे.
धाराशिवनगर येथील सुदर्शन पडवळ, कणेरीवाडी येथील आनंदराव भोसले या शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला आ. जयंत आसगावकर, कॉ. शिवाजी मगदूम, शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे, नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
१० जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध
राज्यातील दहा जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. एकाही आमदारासोबत बैठक झाली नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावानिशी त्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्ह्यातील गजेंद्र यळकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोडसारखे प्रकल्प द्या, बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको, अशी मागणी त्यांनी केली.