"...नाहीतर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं", बारामतीत मराठा आंदोलक आक्रमक

बारामतीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती.
"...नाहीतर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं", बारामतीत मराठा आंदोलक आक्रमक

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात सगळीकडे उपोषण, घोषणा, मोर्चा चालू आहे. मराठा आरक्षण देण्यास जर सरकार असमर्थ असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाप्रसंगी अनेक वक्त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली आहे.

बारामतीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती. पहाटे कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून हा मोर्चा निघाला होता. पुढे भिगवण चौकात या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. अनेक आंदोलकांनी अजित पवार यांनी आरक्षण मिळत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं, अशी तीव्र भूमिका घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच नेतेमंडळींनी मोर्चात सहभागी व्हायला हवं होतं, या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी भावनाही देखील यावेळी व्यक्त केली गेली. आरक्षण द्यायला जमत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असाही आग्रह काही आंदोलकांनी धरला.

दरम्यान, मराठा समाजाच्या वतीने जे आरक्षण आम्ही मागत आहोत. ते आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागत आहोत. असं कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. तर येणाऱ्या सर्व निवडणूकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल, एकही मराठा मतदार मतदान करणार नाही. व वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणूकीला उभं देखील करु, बारामतीचा हा संदेश राज्यात जाईल, अशी भूमिका यावेळी आंदोलकांकडून मांडली गेली.

logo
marathi.freepressjournal.in