...अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांना आवरणे कठीण, अजित पवारांचा महायुतीला इशारा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडला असल्याचे चित्र दिसत आहे.
...अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांना आवरणे कठीण, अजित पवारांचा महायुतीला इशारा
Published on

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडला असल्याचे चित्र दिसत आहे. संघाच्या मुखपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात आल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेतील एका नेत्यानेही राष्ट्रवादीवर ‘उलट्यां’चे प्रहार केले. त्यामुळे तुमच्या नेत्यांना आवरा, त्यांची वादग्रस्त विधाने थांबली नाहीत, तर आमच्या कार्यकर्त्यांनाही आवरणे कठीण जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

नागपूरमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत, तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरणे कठीण जाईल, असे म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. आरोग्य मंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी ‘आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागते. पण बाहेर आल्यावर उलट्या होतात,’ असे वक्तव्य केले होते. तसेच असंगाशी संग केल्याचा फटका भाजपला बसला, असे भाजपचे नेते गणेश हाके म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

वादग्रस्त वक्तव्ये टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेत्यांच्या बेताल वक्तव्याची दखल घेतली आहे. यापुढे महायुतीला तडे जातील, असे वादग्रस्त वक्तव्य परत होणार नाहीत, याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. ‘महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये’ यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in