महाराष्ट्र वाचविण्यास आमचे प्राधान्य - पटोले

दै. 'नवशक्ति' आणि 'द फ्री प्रेस जर्नल'च्या कायार्लयात भेट देऊन पटोले यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
महाराष्ट्र वाचविण्यास आमचे प्राधान्य - पटोले
नवशक्ति
Published on

मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढणार, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार, या प्रश्नांमध्ये आम्हाला तूर्त अजिबात स्वारस्य नाही. राज्याला अलीकडे अमली पदार्थाचा विळखा पडत चालला असून त्यामधूनच हिट ॲण्ड रन, बदलापूरसारखे प्रकार होत आहेत, पब संस्कृती वाढत चालल्याचे स्पष्ट होत असल्याने आपला पुरोगामी महाराष्ट्र वाचविणे यालाच आमचे प्राधान्य राहील, अशी नि:संदिग्ध ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे दिली.

दै. 'नवशक्ति' आणि 'द फ्री प्रेस जर्नल'च्या कायार्लयात भेट देऊन पटोले यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, महाविकास आघाडीचे जागावाटप, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, पोलिसांच्या घरातच होणाऱ्या चोऱ्या, अमली पदार्थांचा राज्याला पडत असलेला विळखा, राज्यातील उद्योग परराज्यात जाण्याचे वाढते प्रकार आदी मुद्द्यांनाही स्पर्श केला. त्याचबरोबर येत्या २७ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यात हिट ॲण्ड रनच्या वाढत्या घटना, वाढती पबसंस्कृती, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमागे अंमलीपदार्थांची वाढती तस्करी कारणीभूत असल्याच्या दाहक वास्तवाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष वेधले. राज्य अराजकतेपासून वाचवायचे असेल, तर अंमलीपदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सत्तेवर आल्यास या तस्करीचा बंदोबस्त करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढून आता १० लाख कोटींवर पोहोचला आहे. महान महाराष्ट्र गहाण महाराष्ट्र ठरत आहे. सरकारच्या रेवडीसंस्कृतीने महागाईसोबतच राज्यातील नागरिकांवरील करांचा बोजा वाढविण्याचा धोका असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा असलेले ठाणे सध्या गुन्हेगारीचा अड्डा झाला आहे. माहीम येथील पोलीस कॉलनीत राहणाऱ्या १३ पोलिसांच्या घरी चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे काय असा सवाल विचारला जात आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे.

महायुती सरकारला कुठलेही प्रश्न सोडवायचे नाहीत. मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक जनगणना करणे गरजेचे असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. विद्यमान राज्य सरकारचेही मराठा नेते जरांगे पाटील व ओबीसीचे नेते हाके यांच्यात विभाजन झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र बदलापूरची घटना घडली आणि जागा वाटपाची चर्चा थांबली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर मंगळवार २७ ऑगस्ट रोजी चर्चा होणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

१० वर्षांत २२ हजार मुली पीडित!

राज्यात २०१४ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईसह राज्यात अत्याचार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० वर्षांत २२ हजार मुली अत्याचार पीडित असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

नजर कैद नवीन पद्धत

अत्याचाराविरोधात कोणी आंदोलन करणार याची कुणकुण महायुतीला लागली तर संबंधित संघटनेच्या व्यक्तीला नजर कैदेत टाकले जाते. महायुती सरकारची ही एक नवीन पद्धत समोर आल्याचे ते म्हणाले.

बुलेट ट्रेनचा काय उपयोग

मुंबईतील बिझनेस गुजरातला पळवले जात आहेत. महाराष्ट्रात काहीच शिल्लक ठेवणार नाही. मग बुलेट ट्रेनचा हट्टास कशासाठी, बुलेट ट्रेनचा मुंबई, महाराष्ट्राला काय उपयोग, असा सवाल त्यांनी केंद्र व महायुती सरकारला केला.

‘लाडकी बहीण' योजनेचा मतांवर परिणाम नाही

अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत लावून धरला होता. मात्र त्याचा लोकसभा निवडणुकीत मतांच्या रूपात फरक दिसून आला नाही. लोकांची भावना अशी असते की मिळालं तर विसरतात आणि नाही मिळालं तर ओरड करतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत मतांवर फारसा परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in