मुलगीच खरा वंशाचा दिवा ; भारत मुलींना दत्तक घेण्यात सर्वाधिक आघाडीवर

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान दत्तक घेतलेल्या २ हजार ९९१ दत्तकांपैकी १ हजार ६९८ केवळ मुली
File photo
File photo

'मुलगी शिकली, प्रगती झाली' हे सूतोवाच आज प्रत्यक्षात खरे होताना दिसत आहेत. आज विविध क्षेत्रात मुली आघाडीवर असून मुलगी नको म्हणणारे आज ' मुलगी हवी' या सकारात्मक मानसिकतेकडे वळल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही जण मुलांऐवजी मुलगी दत्तक घेऊन स्वतःच्या आणि त्यांच्या आयुष्यातली पोकळी दूर करत आहेत. म्हणूनच की काय मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) च्या २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान भारतात दत्तक घेतलेल्या २ हजार ९९१ देशातील दत्तकांपैकी सुमारे १ हजार ६९८ मुली होत्या.

अलीकडच्या काळात देशात स्त्रियांच्या सक्षमीकरणावर बराच भर दिला जात आहे. त्याचवेळी दुसरीकडे स्त्रिया विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून शिक्षणाचे वाढते प्रमाण, सामाजिक संस्थांचा पुढाकार यामुळे दत्तक घेताना देखील मुलींनाच अधिक पसंती मिळत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र २०२०-२१ मध्ये मुलींना दत्तक घेण्याच्या संख्येत दीडपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ६३ बालसंगोपन केंद्रे असून राज्याचा विचार करता पुणे, मुंबई शहरात अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक मुली दत्तक घेण्यास पसंती दिली जात आहे.

परदेशी पालकांचीही भारताकडे धाव

केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत दत्तक विधान प्रक्रियेप्रमाणेच आंतरदेशीय दत्तक प्रक्रियेमध्येही वाढ झाली आहे. २०१३-१४ नंतर यामध्ये विशेष वाढ झाली असून आजूबाजूच्या एकूण ३३ देशांमध्ये गेल्या ७ वर्षात जवळपास ७०० भारतीय मुलांना हक्काचे घर मिळाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ इटली आणि स्पेन या देशांतील पालकांकडून भारतीय मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

ऑनलाइन प्रक्रियेमुळे मूल दत्तक घेणाऱ्या पाल्यांच्या संख्येत निम्म्याने घट

भारतात बाळ दत्तक घेणाऱ्यांच्या संख्येत मागच्या दहा वर्षांत निम्म्याने घट झाली आहे. २०११ साली जवळपास ६ हजार बालकांना दत्तक घेण्यात आले होते. २०२१ मध्ये ही संख्या अर्ध्यावर येऊन ३ हजार १४२ झाली आहे. दरम्यान, २०१५ मध्ये शासनाने बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केल्याने यासाठीचा कालावधी वाढल्यामुळे बेकायदेशीर दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले. यामुळे दत्तक घेणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. 'दत्तक घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडायला दोन-तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे बेकायदेशीर दत्तक वाढले आहेत. काही लोक थेट दवाखान्यातूनच बाळ दत्तक घेतात. शिवाय अठरा वर्षांखालील मुलीचे बाळ असेल तर पॉक्सो कायद्यामुळे लोक गैरप्रकारे दत्तकप्रक्रिया करतात असे वर्ल्ड चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्ट ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

भारतात दत्तक घेतलेल्या मुला-मुलींची आकडेवारी :

वर्ष दत्तक मुलांची संख्या मुले मुली

२०१५ -१६ - ३ हजार ०११ १ हजार १५६ १ हजार ८५५

२०१६ -१७ - ३ हजार २१० १ हजार २९५ १ हजार ९७५

२०१७ -१८ - ३ हजार २७६ ( मुले, मुली आकडेवारी उपलब्ध नाही)

२०१८ -१९ - ३ हजार ३७४ १ हजार ३९७ १ हजार ९७७

२०१९ -२० - ३ हजार ३५१ १ हजार ४१३ १ हजार ९३८

२०२० -२१ - ३ हजार १४२ १ हजार २८६ १ हजार ८५६

२०२१ -२२ - २ हजार ९९१ १ हजार २९३ १ हजार ६९८

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in