
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
मृत व्यक्तींची नावे तसेच अनेक वर्षांपूर्वी स्थानांतरित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अजूनही यादीत कायम असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. निवडणूक आयोगाने या बोगस नोंदी काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे मतदार यादीची पारदर्शकता धोक्यात आली आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना यादी दिली
बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत सुमारे एक लाखाहून अधिक बोगस नावे कायम आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षे झाली तरी त्यांची नावे अद्याप यादीत आहेत. एवढेच नव्हे, तर पंधरा वर्षांपूर्वी बुलडाण्यात कार्यरत असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांची नावेही अजून यादीत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार मतदारांची यादी दिली आहे, ज्यांची नावे दोन ठिकाणी आढळली आहेत.
मात्र, प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निवडणूक आयोगाला या बोगस नोंदींबाबत कळवले असता, त्यांनी उलट बोगस नावे काढू नका, अशी भूमिका घेतली. ही अत्यंत गंभीर आणि लोकशाहीविरोधी बाब आहे, असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला.
राजकीय समीकरणे चर्चेत
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता गायकवाड यांनी महायुतीच्या तयारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, राज्यात तिन्ही पक्षांची, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशी महायुती व्हावी, अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यातही युती करण्याचा कल स्पष्ट आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेतला जाईल. या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.