चौदाशेहून अधिक डॉक्टर लवकरच रुग्णसेवेत; आरोग्याच्या तक्रारी थेट शासनापर्यंत पोहोचणार, ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करणार - प्रकाश आबिटकर

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जातो. राज्यातील जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेत तातडीने निदान करता यावे यासाठी थेट चार लाख लोकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
चौदाशेहून अधिक डॉक्टर लवकरच रुग्णसेवेत; आरोग्याच्या तक्रारी थेट शासनापर्यंत पोहोचणार, ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करणार - प्रकाश आबिटकर
चौदाशेहून अधिक डॉक्टर लवकरच रुग्णसेवेत; आरोग्याच्या तक्रारी थेट शासनापर्यंत पोहोचणार, ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करणार - प्रकाश आबिटकर(Photo- X)
Published on

मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जातो. राज्यातील जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेत तातडीने निदान करता यावे यासाठी थेट चार लाख लोकांशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जनतेच्या आरोग्य समस्या थेट शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देताना १,४४० डॉक्टर उपलब्ध झाले असून लवकरच त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महिला आरोग्य समिती, जनआरोग्य समिती तसेच रुग्णकल्याण समिती यांच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जनआरोग्य संवाद’ साधला. यावेळी राज्यातील विविध भागांतील आरोग्य सेवांची वस्तुस्थिती जाणून घेत त्यांनी समित्यांच्या कामकाजाचा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी समित्यांच्या बैठका नियमित होतात का, रुग्ण दवाखान्यात येतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टर रुग्णांशी योग्य संवाद साधतात का, रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, यासह विविध आरोग्य सेवा विषयक बाबींची थेट माहिती घेतली.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव-२ ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय श्रीपतराव काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले. ‘आरोग्य व्यवस्था कागदावर नाही, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे,’ या भूमिकेतून स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींच्या सूचनावर सरकार सकारात्मक!

या जन आरोग्य संवादामध्ये लोकप्रतिनिधींनीही आरोग्य सेवांबाबतच्या सूचना मांडल्या. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या अनुषंगाने १आठवड्यातून एक दिवस निश्चित करून आढावा बैठक घेण्याची सूचना केली. या सूचनेला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

दंतचिकित्सक आरोग्य सेवा लवकरच!

राज्यात १,४४० डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. तसेच आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. लवकरच सुमारे २५० दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र

‘निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवून आरोग्य सेवांमधील अडचणी समजून घेणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in