लाडक्या बनल्या दोडक्या! पाच लाख बहिणी अपात्र; महायुतीचा धक्का
मुंबई : संजय गांधी निराधार योजना, कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी वाहन अशा विविध कारणांमुळे राज्यातील पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा केला. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. मात्र राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताच लाडकी बहीण आता नावडती झाली आहे, असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यासही सुरुवात झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र बहिणींना योजनेतून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे, असे आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
यामुळे बहिणी अपात्र ठरल्या
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २ लाख ३० हजार
वय वर्ष ६५ पेक्षा अधिक असलेल्या महिला - १ लाख १० हजार
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला- १ लाख ६० हजार
एकूण अपात्र महिला- ५ लाख