
मुंबई : मे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे ६० लाख शेतकरी बाधित झाले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, भाजीपाला आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त ३१ जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
अतिवृष्टीचा तडाखा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांना बसला आहे. तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यभरातील एकूण बाधित क्षेत्र ४२ लाख हेक्टर असून त्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तर ५ सप्टेंबरपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून २८ सप्टेंबरपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र संपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झालेला नाही. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त होईल आणि मदत प्रक्रिया जलदगतीने राबवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सर्वाधिक बाधित क्षेत्र व पिक
बीड : बाधित क्षेत्र : ६,३२,५४९ हेक्टर
तालुके : बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबेजोगाई, परळी, वडवणी, केज
बाधित पिके : कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, मका, ऊस, कांदा, भाजीपाला व फळपिके
नाशिक
बाधित क्षेत्र : २,७९,२२० हेक्टर
तालुके : मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला
बाधित पिके : सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, कांदा, भात, भुईमूग, भाजीपाला, फळपिके
जालना
बाधित क्षेत्र : ३,७५,९७३ हेक्टर
तालुके : अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बाधित पिके : कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भाजीपाला व फळपिके
छत्रपती संभाजीनगर
बाधित क्षेत्र : ५,०८,६८८ हेक्टर
तालुके : छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री
बाधित पिके : कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भाजीपाला, फळ व इतर पिके
लातूर
बाधित क्षेत्र : २,०३,९६६ हेक्टर
तालुके : देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, चाकूर
बाधित पिके : सोयाबीन, तूर, उडीद व इतर
धाराशिव
बाधित क्षेत्र : २,५३,४३५ हेक्टर
तालुके : उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कळंब, वाशी, तुळजापूर
बाधित पिके : सोयाबीन, तूर, उडीद व इतर
अहिल्यानगर
बाधित क्षेत्र : ५,६५,०३२
तालुके : कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर
बाधित पिके : बाजरी, भाजीपाला, कांदा, मका, तूर, उडीद, सोयाबीन, भाजीपाला व फळपिके
हिंगोली
बाधित क्षेत्र : ३०,५४८ हेक्टर
तालुके : कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ
पिके : कापूस, सोयाबीन, तूर, फळपिके
परभणी
बाधित क्षेत्र : २,१०,३१४ हेक्टर
तालुके : परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा
बाधित पिके : कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिके