Nashik : ओझर विमानतळ विस्ताराला प्रशासकीय मान्यता; मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळ विस्तार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Nashik : ओझर विमानतळ विस्ताराला प्रशासकीय मान्यता; मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
Published on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळ विस्तार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.

नाशिकपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेले ओझर विमानतळ सध्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या ताब्यात असून त्यांच्या मार्फतच विमानतळाची देखभाल केली जाते. झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत नवीन एकत्रित टर्मिनल इमारत आणि इतर पूरक सुविधा उभारण्यासाठी सुमारे ५५६ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. राज्य सरकार आणि HAL यांच्यात यासाठी लवकरच सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे.

प्रवासी संख्या वाढणार

विस्तारानंतर टर्मिनलची प्रवासी हाताळण्याची क्षमता ताशी ३०० वरून ताशी १,००० इतकी वाढणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. विमानतळाचा विस्तार हा सिंहस्थ कालावधीत वाढणाऱ्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कुंभमेळ्याचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या कालावधीत करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in