

मुंबई : नाईक मराठा मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, साहित्य शिरोमणी गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या नावाने यंदापासून सुरू केलेला पहिला पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी मंडळाचा मनःपूर्वक ॠणी आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. एखाद्या पुरस्काराचे मोठेपण त्यामागील उभ्या असलेल्या विचारांमुळे वाढते. या पुरस्कारामागे शिक्षणाची तळमळ आहे. समाज परिवर्तनाचे ध्येय आणि वंचित माणसाच्या आयुष्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याची भावना आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळचा आहे, अशी कृतज्ञता जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
नाईक मराठा मंडळ, मुंबई या संस्थेच्यावतीने महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात पुरस्काराचे मानकरी व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी शरद वेंगुर्लेकर, मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गडकर, कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर, सरकार्यवाह न्हानू नाईक, ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, पुरस्काराचे मानकरी हेमंत अणावकर, किशोर नांदोसकर उपस्थित होते तसेच स्मृतीग्रंथाचे प्रकाशन, विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले.
असे आहेत पुरस्कार
गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या स्मरणार्थ साहित्यिक, शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पहिला पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना तसेच उद्योगपती आणि मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. किशोर सातोसकर स्मृती समाजभूषण प्रथम पुरस्कार हेमंत अणावकर यांना तर स्व. महादेव नाईक स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार किशोर नांदोसकर यांना प्रदान करण्यात आला.