
'मिनी स्वित्झर्लंड' अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि.२२) अचानक बेछूट गोळीबार करीत २५ हून अधिक पर्यटकांना ठार केले.
पहलगाममधील पर्वतावर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात. येथील बैसरन या केवळ पायवाट असलेल्या ठिकाणी पर्यटक गेले होते, तेव्हा नजीकच्या खोऱ्यातून आलेल्या दहशतवाद्यांनी क्रूरपणे गोळ्या घालून त्यांना ठार केले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. याशिवाय काहीजण जखमीही आहेत.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जण
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील दोन नागरिक (संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे), पनवेलमधील दिलीप देसले आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. यापैकी कौस्तुभ आणि संतोष आपल्या कुटुंबियांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. तर, मृत दिलीप देसले आपल्या पत्नीसह (ऊषा देसले )निसर्ग ट्रॅव्हल्सच्या बसमधून, पनवेल येथून एकूण ३९ पर्यटकांसह जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते, असे समजते.
जखमींमध्ये कोण?
पनवेलमधील सुबोध पाटील मानेजवळून गोळी गेल्यामुळे जखमी आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर, पनवेलमधीलच माणिक पाटील हल्ल्यामध्ये किरकोळ जखमी आहेत. त्या सुबोध पाटील यांच्या पत्नी असल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील एस. भालचंद्र, हर्षा जैन आणि निकिता जैन नामक व्यक्तींचाही किरकोळ जखमींच्या यादीमध्ये समावेश असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. तथापि, त्यांच्याबाबत अन्य माहिती मिळू शकलेली नाही.
थोडक्यात बचावले नागपूरचे कुटुंब
या हल्ल्यावेळी नागपूरचे रुपचंदानी कुटुंब देखील तिथे होते, मात्र सुदैवाने गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी टेकडीवरुन उड्या मारल्या. यावेळी घसरून सिमरन रुपचंदानी जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून श्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यासह असलेल्या अन्य दोन व्यक्तीही सुखरूप आहेत.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून लगेचच भारतात परतले. परिस्थितीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्यांनी एक इमर्जन्सी ब्रीफिंग मीटींग घेतली. हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.