
काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली. डोंबिवलीमध्ये बंद तर उल्हासनगर, जळगाव, पुणे, सातारा, जळगाव आणि रत्नागिरीत गुरुवारी आंदोलने, मोर्चा काढण्यात आला. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
डोंबिवलीत कडकडीत बंद; दहशतवाद्यांना भर चौकात ठार करा! मृतांच्या नातेवाईकांची मागणी
डोंबिवली शहरात या हल्ल्यातील स्थानिक नागरिकांच्या मृत्यूमुळे विशेषतः तीव्र प्रतिक्रिया उमटली. शहरातील बहुतांश दुकाने, कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या, तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे तीन नागरिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यांच्या अंत्यसंस्काराला शोकाकुल वातावरणात मोठा जनसमुदाय उपस्थित होता. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली. शाळा, कॉलेज, बाजारपेठा आणि वाहतूक सेवाही प्रभावित झाली.
सकाळपासूनच डोंबिवलीतील अनेक दुकाने, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डोंबिवलीतील नागरिकांनी या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व डोंबिवलीकरांनी श्रद्धांजली वाहिली. डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला.
स्व. हेमंत जोशी, स्व. संजय लेले व अतुल मोने यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारने अतिरेक्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी,धर्माच्या द्वेषाने बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून शूट अँड साईट प्रमाणे त्यांनाही भर चौकात ठार मारावे. अतिरेकी हल्ला करताना तुम्ही हे काय करतायत? असे बोलणाऱ्या एका भारतीय नागरिकांना अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या. आम्ही सर्व जण खूप घाबरलो होतो.' तुमच्या पैकी कोणी हिंदू असाल तर त्यांनी हात वर करा ' असे अतिरेकी म्हणाले.
पिक्चरमध्ये पाहिले तसे ते अतिरेकी दिसत होते. तोंडावर मास्क लावून अतिरेकी आम्हाला विचारत होते. त्या अतिरेक्यांच्या डोक्यावर कॅमेरे लावले होते. काही वेळाने आम्ही खाली आल्यावर स्थानिकांनी मदत केली. हर्षद मोने याने सरकारकडे मागणी केली आहे की, धर्माच्या द्वेषाने बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांना पकडून शूट अँड साईट प्रमाणे त्यांनाही भर चौकात ठार मारावे अशी भावना व्यक्त केली. डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अस्थापना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी होणारी परीक्षा शनिवारी दिनांक २६ तारखेला वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेनुसार होईल असा निर्णय घेतला. त्याचबरोबर उत्स्फूर्त डोंबिवली बंदमध्ये सहभागी होऊन दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करूया, असा एक मेसेज शाळेच्या वतीने देण्यात आला.
पुण्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट; संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो पुणेकरांनी साश्रू नयनांनी या दोघांना अखेरचा निरोप दिला. एकीकडे दुःख तर पाकिस्तान विरोधात संतापाची लाट असे चित्र गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत होते. आपल्या वडिलांच्या रक्ताने माखलेली कपडे घालूनच जगदाळे यांची मुलगी आसावरी हिने वडिलांचा अंत्यविधी केला.
रक्ताने माखलेले कपडे घालून आसावरी आली असल्याचे उपस्थितांना कळाले तेव्हा पहलगाम येथील दहशतवादी हल्ला किती भयावह असेल या विचाराने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्याचवेळी पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त करीत पाकिस्तान विरोधात घोषणबाजी करत वंदे मातरम, भारत माता की जय चा नारा दिला.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात जगदाळे (५४) व कौस्तुभ गनबोटे (५६) हे मृत्युमुखी पडले. कै. संतोष व कै. कौस्तुभ यांचे पार्थिव विशेष विमानाने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पुण्यात आणण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
शरद पवारांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
सकाळी नऊच्या सुमारास या दोघांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार मेधा कुलकर्णी यांनी या दोघांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. वैकुंठ स्मशानभूमीत प्रारंभी कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव आणले गेले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दीपक मानकर, गजानन थरकूडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सह सर्वपक्षीय माजी नगरसेवक तसेच सामाजिक संस्थाचे पदाधिकारी व हजारो पुणेकर उपस्थित होते.
जळगावात पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादाचा निषेध
जळगाव : पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात निरपराध पर्यटक मारले गेले याची जळगावात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली असून विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. शिंदे सेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध केला. दरम्यान जळगाव जिल्ह्यातून ४७ जण काश्मीरला पर्यटनासाठी गेले असून ते सर्व सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांच्या हत्येनंतर देशभर संतापाची लाट उसळली असून जळगावात देखील या हत्येचा निषेध करण्यात आला. शिंदे सेनेने जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत पाकिस्तानचा झेंडा पायी तुडवत तो जाळत निषेध व्यक्त केला. या प्रसंगी बोलतांना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाहे यांनी या हल्ल्यामागे असणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बुधवारी रात्री पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि कार्यालय सेक्रेटरी वाय एस महाजन यांच्या नेतृत्वात आपल्या कार्यालया बाहेर मेणबत्त्या लावत या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करून या घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमोद पाटील यांनी या भ्याड हल्लयाचा निषेध करत सरकारने या दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
विश्व हिंदू परिषद आणि विविध संघटना यांच्या वतीने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत या हल्ल्याचा निषेध केला रिपाइ संघटनांच्या वतीने देखील निषेध करत हल्ल्यातील मृतास श्रध्दांजली वाहण्यात आली. सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने या दुदैवी घटनेचा निषध करतएका निवेदनाव्दारे या अतिरेक्यांविरोधात पावले उचलावीत, अशी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली.
जळगावातील ४७ पर्यटक सुरक्षित
जिल्ह्यातील ४७ नागरिक काश्मीर दौऱ्यावर असून ते सर्व सुखरूप असल्याचे त्यांनी येथे कळवले आहे. या ४७ मध्ये १५ जण चाळीसगावचे असून त्यांना सोनमर्गहून परततांना या हल्ल्याची माहिती मिळताच दौरा थांबवत श्रीनगरला एका हॉटेलात मुक्काम केला असून चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. जळगावचे मंत्री गिरीश महाजन देखील सध्या श्रीनगरला महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सहाय्यासाठी गेलेले आहेत. शाळांना सुट्ट्या लागताच काश्मीर सहलीची तयारी अनेकजणांनी केली होती. ३०० वर पर्यटकांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून बुकिंग केले होते. आता या सर्वांनी बुकींग रद्द करण्यात आले आहे. याचा फटका या टूर कंपन्यांना बसला आहे.
दहशतवादाविरोधात उल्हासनगर एकवटले; सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला
उल्हासनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात गुरुवारी दुपारी सर्वपक्षीय निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणांनी वातावरण भारून गेले. विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येत देशभक्तीचा घोष दिला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तीव्र संताप व्यक्त केला, तर भाजपने श्रद्धांजली अर्पण करत कँडल मार्च काढला.
या आंदोलनात भाजपचे आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, शिवसेना उबाठा कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मनोज लासी, कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती, नरेंद्रकुमारी ठाकूर, शिवाजी रगडे, काँग्रेसचे रोहित साळवे, मनसेचे बंडू देशमुख, संजय घुगे, पीआरपीचे प्रमोद टाले, तसेच मैनुद्दीन शेख, शैलेश पांडव, दिनेश शेतपलानी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनात शिवसैनिकांचा आक्रोश विशेष लक्षवेधी ठरला. कॅम्प क्र. ५ मधील बस स्टॉप चौकात महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. विजय पाटील यांनीही आक्रमक भाषण करत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना ‘आदेश द्या, आम्ही बॉर्डरवर जाऊ’ असा नारा दिला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला.
शिवसेनेच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात महिला आघाडी, युवासेना आणि माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांनी सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बुधवारी रात्री कँडल मार्च आयोजित करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या भ्याड हल्ल्यातील दोषींना तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी सरकारकडे केली असून, देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वसामान्य नागरिकही सज्ज असल्याचा संदेश या आंदोलनातून उमटला आहे.
आज ‘नांदेड बंद’ची हाक
नांदेड : काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२५) नांदेड बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी काश्मीर राज्यातल्या पहलगाम येथे इस्लामिक आतंकवादी संघटनेने धर्म विचारत निष्पाप हिंदूंची हत्या केली. या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. धर्म विचारून झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये व्यापारी, सर्व संघटना, शाळा, महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवून हा बंद यशस्वी करावे, असे आवाहन महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी केले आहे. भाजपच्या या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन केले. यावेळी खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. श्रीजया चव्हाण, प्रवीण साले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पहलगामच्या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कारवाईचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच नांदेड बंदच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला असून सर्व नागरिकांना या बंदमध्ये सहभाग नोंदवावा, असे आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, महानगराध्यक्ष जीवन घोगरे यांनी केले आहे.
...आणि आम्ही देखील‘अल्लाह हू अकबर’ म्हटले
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जेष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी भावूक झाल्या.
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली, पण ती उशिरा झाली, तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या. तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथे असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या-मोठ्या अजाण म्हटले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकले.
तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथे घोड्यावर बसून गेलो, तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ म्हणायला लागलो असे कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितले .
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले मृत्युमुखी पडले. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाची खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, जगदीश घरत, सुधाकर थवई, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे आदी उपस्थित होते.
केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही सुखरूप वाचलो! कराड तालुक्यातील हेळगावचे
१७ पर्यटक सुखरूप
कराड : काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेपासून केवळ एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १७ पर्यटक सुखरूप असल्याचे थेट काश्मीरमधून कराड तालुक्यातील हेळगाव येथील भरत सूर्यवंशी आणि अमोल पवार यांनी दूरध्वनीवरून सांगितले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मूळचे सातारा जिल्ह्यातील बुधवारी ता खटाव येथील संतोष एकनाथ जगदाळे यांचाही समावेश आहे. दरम्यान, त्या घटनेचा चित्त थरारक अनुभव डोळ्यांतील आसवे आवरत व दाटल्या गळ्याने सांगितला आणि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो, मात्र पर्यटकावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. याबाबत माहिती सांगताना भरत सूर्यवंशी म्हणाले, मंगळवारी आम्ही पेहलगाममधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ती बैसरण घाटी बघून अर्ध्या तासानंतर, वेरू व्हॅली बघितली नंतर चंदनवरी व्हॅली पहात होतो तेव्हा आम्हाला समजले इथे जवळच वरती आतंकवादी हमला झाला. तो आमच्यापासून केवळ २ किलोमीटर अंतरावरती झाला.