निवडणूक प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित; शिवसेना नेते विलास भुमरे यांनी छोट्या मुलाला मतदान कक्षात नेल्याने वाद

पैठण येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास भुमरे यांनी त्यांच्या छोट्या मुलाला मतदान कक्षापर्यंत नेले. यावरून दिवसभर जोरदार टीका झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या हलगर्जीप्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड बु. येथील मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित; शिवसेना नेते विलास भुमरे यांनी छोट्या मुलाला मतदान कक्षात नेल्याने वाद
निवडणूक प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित; शिवसेना नेते विलास भुमरे यांनी छोट्या मुलाला मतदान कक्षात नेल्याने वाद
Published on

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास भुमरे यांनी त्यांच्या छोट्या मुलाला मतदान कक्षापर्यंत नेले. यावरून दिवसभर जोरदार टीका झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या हलगर्जीप्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड बु. येथील मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत माहिती दिली.

मतदान केंद्र क्रमांक ५८ पाचोड बु. (जि.प. केंद्र प्राथमिक शाळा पाचोड बु., पश्चिम बाजू, खोली क्र. ४) येथे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दिलीप देवराव नरवडे (केंद्रप्रमुख, सहाय्यक शिक्षक), संगीता नामदेव केदार (मतदान अधिकारी), रेणुका सुरेश बोंबले (होमगार्ड) यांचा समावेश आहे.

या तिन्ही कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले. मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास भुमरे यांना लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. ज्यामुळे मतदान प्रक्रियेची गोपनीयता धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली. तसेच, आवश्यक ती दक्षता न घेता प्रशिक्षणानुसार नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळले.

याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते; मात्र ते अमान्य ठरवून त्यांना मतदान समाप्तीच्या क्षणापासून शासकीय सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण यांना देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत देय असलेल्या निर्वाह भत्त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन सापडली ढाब्यावर

सोलापूर : महाराष्ट्रात शनिवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीनच ढाब्यावर सापडल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोग व सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, ईव्हीएम मशीनला नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता याला कारणे काय देणार? ईव्हीएमबाबत वारंवार शंका उपस्थित होत आहेत. तसेच यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असते, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in