
भारत पाकिस्तान सामना सुरु असताना रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर मालवण येथे काही समाजकंटकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. देशविरोधी घोषणा देणाऱ्या आरोपीच्या मालवण येथील भंगार दुकानावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी (दि.२४) ही कारवाई केली. शिवसेनेचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी या कारवाईबाबत सोशल मीडिया पोस्टवर माहिती दिली आहे. तसेच या कारवाईचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, ''मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीयला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार,'' असे त्यांनी म्हटले आहे.
दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर काल रविवारी (दि.२३) भारत-पाकिस्तान सामना खेळवला गेला. मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील मालवणमध्ये दोन जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. त्यांना स्थानिकांनी पकडले आणि ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. सोमवारी स्थानिकांनी या घटनेच्या निषेधार्थ बाईक रॅली काढली. आरोपीच्या भंगार दुकानावर केलेल्या बुलडोझर कारवाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.