
पालघर : महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात शिकार करण्यासाठी गेलेल्या काही गावकऱ्यांच्या गटाने आपल्याच गटातीलच एका व्यक्तीला रानडुक्कर समजून गोळी घालून ठार केल्याची घटना घडली. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना २८ जानेवारीला रात्री बोरशेती जंगल परिसरात घडली, असे पोलिसांनी सांगितले.
पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धराशिवकर यांनी सांगितले की, काही गावकरी रानडुक्करांची शिकार करण्यासाठी मानोर येथील बोरशेती जंगलात गेले होते. शिकार शोधताना काही जण गटापासून वेगळे झाले. काही वेळानंतर, एका शिकाऱ्याने रानडुक्कर समजून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोन जणांना गोळी लागली. त्यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
या अनपेक्षित घटनेने गटातील सदस्य घाबरले आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी मृत व्यक्तीचे शव झाडाझुडपांत लपवले व याबाबत पोलिसांना कळवले नाही. याप्रकरणी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले. बुधवारी मोठ्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला, तो अत्यंत सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे," असे धाराशिवकर यांनी सांगितले.