

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे फटाके बनवणाऱ्या कारखान्यात मंगळवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून भावेश दिलीप वावरे (२५) आणि मोनिका पडवळे (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, मोनिका वारदी, जागृती गवते, प्रतिभा पवार, आणि मोनिका महेंद्र जाधव अशी जखमींची नावे आहेत.
जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित कारखान्यात एकूण ३५ कामगार काम करतात. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, कोणसई परिसरात हा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. यात सुतळी बॉम्ब व अन्य फटाक्यांचे उत्पादन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
सण-उत्सव आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अशा बेकायदेशीर कारखान्यांची संख्या वाढत आहे.