

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे. मुक्काम इतरत्र हलविणे वा सध्याच्या जागेतील उपाय योजनांबाबत ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव अद्याप कुणाकडून आला नसल्याने आळंदी देवस्थानने याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. येत्या १ मे रोजी यावर अधिकृत निर्णय घेऊ, असे देवस्थानने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.
भवानी पेठ मुक्काम ठिकाणी सोयी, सुविधांबाबत देवस्थानकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. त्यात योग्य त्या उपाययोजना देवस्थानतर्फे सुचविण्यात आल्या. मात्र, १२ एप्रिलपर्यंत मुक्कामाबाबत ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी, भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटना पदाधिकारी, श्रीगुरू हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांची संयुक्त बैठक प्रशासनाच्या वतीने पुढील ८ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे.
वेळापत्रक लांबले...
आळंदी देवस्थानतर्फे पालखी भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबतचा निर्णय रविवारी घेण्यात येणार होता व त्यानंतर अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते. मात्र, हा निर्णय लांबल्याने अधिकृत मुक्काम नमूद करून प्रिंट स्वरूपातील वेळापत्रक जाहीर करण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.