पंचवटी एक्स्प्रेस परंपरेचा सुवर्ण अध्याय; सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल

मध्य रेल्वेची प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक गाडी ‘पंचवटी एक्स्प्रेस’ शनिवारी (१ नोव्हेंबर २०२५) आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी प्रथम धावलेली ही गाडी गेल्या पाच दशकांपासून मुंबई-नाशिक-मनमाड दरम्यान हजारो प्रवाशांच्या जिवनाचा अविभाज्य भाग ठरली आहे.
पंचवटी एक्स्प्रेस परंपरेचा सुवर्ण अध्याय; सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल
पंचवटी एक्स्प्रेस परंपरेचा सुवर्ण अध्याय; सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल
Published on

नाशिक : मध्य रेल्वेची प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक गाडी ‘पंचवटी एक्स्प्रेस’ शनिवारी (१ नोव्हेंबर २०२५) आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी प्रथम धावलेली ही गाडी गेल्या पाच दशकांपासून मुंबई-नाशिक-मनमाड दरम्यान हजारो प्रवाशांच्या जिवनाचा अविभाज्य भाग ठरली आहे. वेळेची अचूकता, विश्वासार्हता, वेग आणि सुरक्षितता या गुणांसाठी ओळखली जाणारी ही गाडी आजही प्रवाशांची पहिली पसंती आहे. त्या काळात औद्योगिक देवाणघेवाण वाढल्याने मुंबई, नाशिक आणि मनमाड दरम्यान एक वेगवान आणि आरामदायक दैनंदिन रेल्वे आवश्यक होती. अशा परिस्थितीत १ नोव्हेंबर १९७५ रोजी पंचवटी एक्स्प्रेसची पहिली फेरी धावली आणि ती लगेचच नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांची जीवनरेखा ठरली.

पंचवटी एक्स्प्रेस ही फक्त मुंबई-नाशिक-मनमाडदरम्यान धावणारी रेल्वे नाही. ती आमच्या आयुष्याचा एक भाग आहे. रोजच्या प्रवासात निर्माण झालेल्या मैत्री, गप्पा, संघर्ष आणि आठवणी या सर्व या गाडीशी जोडल्या आहेत. ती आमची ‘मोबाईल कुटुंब’ आहे.

राहुल कुलकर्णी, लासलगाव

आवश्यकतेतून जन्मलेली गाडी

१९७५ साली मुंबई-नाशिक मार्गावरील वाढत्या प्रवासी ताणाला उत्तर म्हणून मध्य रेल्वेने ‘पंचवटी एक्स्प्रेस’ सुरू केली. गाडीचे नाव ‘पंचवटी’ म्हणजेच प्रभू श्रीरामांनी वनवासकाळात वास्तव केलेलं नाशिकमधील पवित्र स्थळ यावरून देण्यात आले. त्यामुळे नाशिककरांशी या गाडीचे भावनिक नाते तत्काळ जुळले.

पाच दशकांचा सुवर्ण प्रवास

गेल्या ५० वर्षांत पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले. आधुनिक डबे, एसी चेअर कार, अधिक वेगवान इंजिन, उत्तम स्वच्छता आणि सुरक्षेची सुधारणा. वेळेचे काटेकोर पालन आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळे ती मध्य रेल्वेतील आदर्श गाडी म्हणून ओळखली जाते.

मुंबई-नाशिक प्रवाशांची जीवनवाहिनी

सुमारे २५८ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ४ तास ४५ मिनिटांत पूर्ण करणारी पंचवटी एक्स्प्रेस ही व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, औद्योगिक कामगार आणि शेतकरी या सर्व घटकांसाठी महत्त्वाची दुवा ठरली आहे. नाशिकच्या द्राक्ष, कांदा आणि उद्योग क्षेत्राशी निगडित हजारो प्रवाशांचं या गाडीशी नातं पिढ्यान्पिढ्या टिकून आहे.

logo
marathi.freepressjournal.in