

रामभाऊ जगताप /कराड
सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या, ‘महाराष्ट्राचे काश्मीर’ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे सध्या देश-विदेशातील पॅराग्लायडर्स एका अनोख्या साहसाची साक्ष देत आहेत. पाचगणीच्या आकाशात रंगीबेरंगी पॅराग्लायडर्सचा मुक्त संचार पाहायला मिळत असून ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप’ स्पर्धेचा थरार अधिकृतपणे सुरू झाला आहे. या जागतिक स्पर्धेमुळे पाचगणीच्या साहसी पर्यटनाला नवे पंख लाभले आहेत.
महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील तब्बल २०० नामांकित पायलट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायलट पाचगणीत दाखल झाले आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून हॉटेल व्यवसाय, लॉजिंग तसेच स्थानिक बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
दररोज हवामानाचा अंदाज घेऊन स्पर्धकांना एक आव्हानात्मक ‘टास्क’ दिला जातो. रवाईन हॉटेलजवळील तळमाळ येथून टेक-ऑफ केल्यानंतर स्पर्धकांना मेढा, वाठार आणि सुरूर असा कठीण मार्ग पार करत वाई येथील डी-मार्ट परिसरात सुरक्षित लँडिंग करावे लागते.
हवेचा वेग व दिशा यांचा अचूक अंदाज घेत, कमीत कमी वेळेत हे अंतर पार करणारा आणि सर्वाधिक गुण मिळवणारा स्पर्धक या जागतिक स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. जीवाची पर्वा न करता, मात्र अत्यंत सावधगिरी बाळगत हे पायलट कौशल्यपूर्ण उड्डाण करताना दिसत आहेत.
रवाईन हॉटेल रोडवरील तळमाळ येथे ही थरारक उड्डाणे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पॅराग्लायडर्समुळे पाचगणीचे आकाश उजळून निघाले असून हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पर्यटनाची ‘गगनभरारी’
पाचगणीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धा होत असल्याने शहरातील हॉटेल्स, लॉजिंग आणि स्थानिक बाजारपेठेत मोठी तेजी आली आहे. या स्पर्धेमुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर ‘ॲडव्हेंचर टुरिझम’मध्ये पाचगणीचा ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचत आहे.
पंचगणी हे पॅराग्लायडिंगसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. पर्यटनप्रेमी आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्यामुळे युरोपमध्ये भरवली जाणारी ही वर्ल्ड कप स्पर्धा यंदा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून पंचगणीचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
अनुपम जाधव-पाटील, आयोजक