

जळगाव : पाचोरा शहर व तालुका परिसराला अतिवृष्टीने चांगलेच थैमान घातले. चार तासात १५३ मिमी पाऊस कोसळल्याने अंजनी, हिवरा नदी व इतर नाल्यांना पूर आला. परिणामी पाचोरा शहरातील वसाहती, वाल्मिक नगर, शिवाजी नगर तसेच आसपासच्या भागातील अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरले.
तालुक्यातील खडकदेवळा, गाळण, भडगाव, नाचनखेडा गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. १६ गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. परंतु, वरखेडी येथील सतिश मोहन चौधरी नावाच्या शेतकऱ्याचा पुरात वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडली. दहिगाव ते बोरनाम परिसरातील नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली, तर उत्राण आणि आमडदे परिसरात नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पाचोरा शहर व परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर दिला व मदतीचा विश्वास दिला. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, एनडीआरएफ निकषानुसार शासनाकडून तात्काळ मदत दिली जाईल. नगरपरिषद, स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफ पथक तात्काळ मदत व बचाव कार्य करत असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील घरांचे, दुकानांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासन आणि शासन नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहतील.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या या निधीमुळे शेतकऱ्यांना थेट मदत मिळेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकरच मदत जाहीर केली. जाईल.
पाच दिवस ढगाळ हवामान
जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. बुधवार दि.२४ आणि दि.२६ सप्टेंबरला यलो अलर्ट कायम राहून हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत कमाल तापमान २७-२८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१-२२ अंश सेल्सीअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ९-१२ किमी/तास असेल. २३ सप्टेंबरला नाशिक व घाट क्षेत्रात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी/तास) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
गंगापूर धरणातून विसर्ग वाढला
राज्यात परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. विशेषतः नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ६,३५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (दि.२२) गंगापूर धरणातून २७६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर मंगळवारी (दि.२३) हा विसर्ग ६,३५६ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पाण्यामुळे दुतोंड्या मारुती परिसराच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले आहे. त्याचबरोबर, दारणा धरणातूनही विसर्ग वाढवून २,२०४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, ज्यामुळे नदीकाठच्या भागात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहावे, आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९.८६ कोटींची मदत मंजूर
राज्य शासनाने जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत जळगाव जिल्ह्यासाठी ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील १७,३३२ शेतकरी नुकसानग्रस्त ठरले होते. या शेतकऱ्यांना शेत पिकांचे नुकसानभरपाईसाठी मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. यानंतर कॅबिनेट बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांनी एकत्रितपणे पाठपुरावा करून निधी मंजूर केला. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होणार असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे.