पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; पनवेल येथे ट्रॅक्टरला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू, ४२ प्रवासी जखमी

Warkari Bus accident: आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथून खासगी ट्रॅव्हल्स बसने पंढरपूर येथे यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, ४२ भाविक जखमी झाले आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; पनवेल येथे ट्रॅक्टरला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू, ४२ प्रवासी जखमी
ANI
Published on

नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथून खासगी ट्रॅव्हल्स बसने पंढरपूर येथे यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, ४२ भाविक जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल येथे घडली. या अपघातातील जखमी भाविकांवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या मृत ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीमधील निळजे घेसरगांव येथे राहणारे सत्यवान गायकर यांनी पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येकी १८०० रुपये घेऊन खंडेराय ट्रॅव्हल्स या खासगी बसची सोय केली होती. त्यामुळे जुनी डोंबिवली तसेच निळजे घेसरगांव भागातील ४२ भाविक पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी या बसमधून मंगळवारी, १५ जुलैला रात्री १०.३० वाजता निघाले होते. सदर बसमध्ये दहिसर येथे आणखी १० भाविक चढले. बसमधील भाविकांमध्ये २५ महिला होत्या. सदर बस मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आल्यानंतर साधारण ५ कि.मी. अंतरावर बसचालकाला त्यांच्यापुढे असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही. त्यामुळे भाविकांची बस वेगाने ट्रॅक्टरवर धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या भाविकांची बस रस्त्याच्या बाजूला असलेला संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या पाइपलाईनवर धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमधील सर्व भाविकांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमी भाविकांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापैकी एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रॅक्टरचालक आणि त्याचा सहकारीदेखील गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या अपघातात गुरुनाथ बापू पाटील (७०), रामदास नारायण मुकादम (७०) आणि हौसाबाई पाटील (६५) या ३ भाविकांचा तसेच ट्रॅक्टरचालक तरेवाज सलाउद्दीन अहमद (२७) आणि दीपक सोहन राजभर (३०) यांचा मृत्यू झाला.

या अपघातात बसचालकासह ४२ भाविक किरकोळ आणि गंभीर जखमी झाले असून त्यापैकी विठाबाई बाळाराम काळण (४५), यमुनाबाई अशोक साळुंखे (५४), हिराबाई त्रिबंधु साळुंखे (६०), विशाल जनार्दन पाटील (४७) आणि बसचालक संजय बापुराव पाटील (५३) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर भाविकांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

मृत ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅक्टर घेऊन जाण्यास मनाई असतानासुद्धा चालकाने एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅक्टर नेल्यामुळे सदर अपघात घडल्याचे आढळून आले आहे. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पंढरपूर यात्रेकरूंच्या खासगी ट्रॅव्हल्स बसचालकाला पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने तो या ट्रॅक्टरवर धडकून सदरचा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला मृत ट्रॅक्टरचालकाला जबाबदार धरून त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मनाई असूनही एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅक्टर गेला कसा?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अपघात घडू नये यासाठी या मार्गावरून दुचाकी, तीन चाकी तसेच ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांना बंदी आहे. एखाद्या वाहनचालकाने दुचाकी अथवा तीन चाकी वाहन नेल्यास वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, १५ जुलै रोजी मध्यरात्री एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅक्टर गेला कसा? वाहतूक पोलीस किंवा महामार्ग पोलिसांना ट्रॅ्क्टर निदर्शनास कसा आला नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वेळीच या ट्रॅक्टरला एक्स्प्रेस मार्गावर जाण्यास रोखले असते तर हा अपघात झाला नसता, अशा प्रतिक्रिया जखमी भाविकांमधून व्यक्त होत आहेत.

जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार - मुख्यमंत्री

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन या अपघातातील जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी या अपघातात मृत पावलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच त्यांनी अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचारावरील सर्व खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

logo
marathi.freepressjournal.in