
बीड : मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातातील एका गंभीर जखमी महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ऑटोला जवळपास ५० ते ६० फूट फरफटत नेले.
माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही लोक ऑटोने रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेलगावकडून माजलगावकडे जात होते. नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या आयशरने या ऑटोला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात ऑटोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या गंभीर जखमी महिलेचा सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.