नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन; मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय

विठ्ठल मंदिरात नवदाम्पत्याला आता थेट दर्शन मिळणार आहे. पंढरपूर येथे नवदाम्पत्य सुखी आयुष्यासाठी विठुरायाच्या दर्शनाला येतात.
नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन; मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय
Published on

पंढरपूर : विठ्ठल मंदिरात नवदाम्पत्याला आता थेट दर्शन मिळणार आहे. पंढरपूर येथे नवदाम्पत्य सुखी आयुष्यासाठी विठुरायाच्या दर्शनाला येतात. त्यांना दर्शनासाठी अनेकदा तासनतास उभे रहावे लागते. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदाम्पत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती. मात्र हीच घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुन्हा एकदा केली. विशेष म्हणजे केवळ नवदाम्पत्यच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. अनेक जण राज्यातील कोनाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात. नवदाम्पत्याला दर्शनासाठी तासन तास लागतात. आता पंढरपूरात वेळ वाचणार असल्याने त्यांना इतर धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार आहे.

व्हीआयपी दर्शनाला फाटा

या ८ फेब्रुवारी रोजी माघ यात्रा आहे. त्यासाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्रांप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in