वारकऱ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी ‘चरण सेवा’; १ लाख ४० हजार वारकऱ्यांना थेट लाभ

वारकऱ्यांच्या पायांची मालिश करण्यासाठी २ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाचे उत्पादन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी ‘चरण सेवा’; १ लाख ४० हजार वारकऱ्यांना थेट लाभ
Published on

मुंबई : आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. कधी ऊन तर कधी पाऊस अशा थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत १ लाख ४३ हजार वारकऱ्यांना थेट सेवा मिळाली असून, १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृती पोहोचली आहे.

या उपक्रमात राज्यभरातील ९ हजार ४७५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पॅरामेडिकल विद्यार्थी, नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. याशिवाय, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, बीड आणि धाराशिव या सात जिल्ह्यांचा सक्रिय सहभाग लाभलेला आहे. या सेवेचा फायदा पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना होत आहे.

रथाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून चरण सेवा उपक्रम सुरू आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या वारकऱ्यांसोबतच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. चरणसेवेसोबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती आरोग्य जनजागृती रथाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे.

योगसत्रे आणि सांस्कृतिक सहभाग

वारकऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सात ठिकाणी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसोबत आरोग्याचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम आदर्श ठरत आहे. तसोच पालखी मार्गावर रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत.

३३७ ठिकाणी वैद्यकीय सेवा आणि चरण सेवा !

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या संकल्पनेतून पालखी मार्गावरील ११६ विश्रांती व मुक्कामाच्या ठिकाणी तर, पालखी मार्गावरील २२१ आपला दवाखान्यांमधून चरणसेवा व आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत. या उपक्रमात २१९ आरोग्य संस्थांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या पायांची मालिश करण्यासाठी २ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाचे उत्पादन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in