पंकजा मुंडेंना पुन्हा हुलकावणी; राज्यसभेचे केवळ गाजर, उमेदवारी दुसऱ्यांनाच

राज्यसभेची निवडणूक असो की, विधान परिषदेची, प्रत्येक निवडणुकीत भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच आघाडीवर असते. नेहमीप्रमाणे सध्याच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीतही त्यांचे नाव आघाडीवर होते.
पंकजा मुंडेंना पुन्हा हुलकावणी; राज्यसभेचे केवळ गाजर, उमेदवारी दुसऱ्यांनाच

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्यसभेची निवडणूक असो की, विधान परिषदेची, प्रत्येक निवडणुकीत भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच आघाडीवर असते. नेहमीप्रमाणे सध्याच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीतही त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे २०१९ पासून प्रवाहाबाहेर असलेल्या पंकजा मुंडे यांना आता तरी राज्यसभेवर संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांना पक्षाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या मनात काय, केवळ उमेदवारीचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील ३ रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार, यावरून खल सुरू झाला. त्यावेळी भाजपच्या गोटातून विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे तर जवळपास निश्चित मानली जात होती. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींकडे जी ८ नावे पाठविण्यात आली होती, त्यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नावे होती. त्यामुळे २०१९ नंतर आता तरी पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल, असे बोलले जात होते. मात्र, ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्याच जिल्ह्यातील डॉ. अजित गोपछडे यांना आणि चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना नेहमीप्रमाणे पुन्हा हुलकावणी मिळाली. या अगोदर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर होते, तेव्हाही ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे पक्षात पंकजा मुंडे यांनी केवळ गाजर दाखविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांतून होत आहे.

पंकजा मुंडे यांनी याबद्दलचे संकेत नुकत्याच झालेल्या बीड दौऱ्यातच दिले होते. त्यावेळी त्यांनी पक्षात नवनवे लोक येत असल्याने आपल्याला संधी मिळेल, याची शाश्वती नसल्याचे संकेत दिले होते. तुम्ही राज्यसभेवर जाणार की, लोकसभा निवडणूक लढविणार, असे विचारले असता माझ्या जनतेला मी जिथे असावे असे वाटते, तिथे असेन, असे सांगून पक्षश्रेष्ठींबद्दल नाराजी बोलून दाखविली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे अगोदरच माहित असावे, असे बोलले जात आहे. परंतु यावरून पंकजा मुंडे समर्थकांत नाराजी वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in