Pankaja Munde : "मी ताईला नाशिकमधून उभे करेन", पंकजा मुंडेंच्या विधानाने चर्चेला उधाण

नाशिकसाठी शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते या दोघांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
Pankaja Munde : "मी ताईला नाशिकमधून उभे करेन", पंकजा मुंडेंच्या विधानाने चर्चेला उधाण

बीड मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी न देता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना पक्षाकडून उमेवारी देण्यात आली. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना पक्षाकडून नवीन कोणती जबाबदारी मिळणार की, राजकारणापासून दूर रहावे लागणार, अशा चर्चा एका बाजूला सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी त्यांच्या बीड प्रचारसभेत प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभी करेन असे विधान केले. पंकजा मुंडेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी मत मागणार नाही, हा पंकजा मुंडेचा जाहीर शब्द आहे. मी प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही. मला तिकीट देऊ नका, असे म्हणत मी सगळीकडे गेले. पण, माझ्या आता लक्षात आले की ही निवडणूक कशाची आहे. ताईचे कुठेही अडणार नाही, मी ताईला नाशिकमधून उभे करेन, तुम्ही काही काळजी करू नका", असे विधान त्यांनी जाहीर सभेत केले आहे.

महायुतीत नाशिक मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असतानाच पंकजा मुंडेंच्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन नाशिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. तरीही महायुतीसाठी नाशिकचा तिढा कायम आहे.

नाशिकचा तिढा

शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते हे नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर गोडसे आणि बोरस्ते यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान, छगन भुजबळ या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा भाजपनेही या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता वाढतच चालला आहे. आता नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in