पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून 'या' ५ उमेदवारांची नावं जाहीर

लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून 'या' ५ उमेदवारांची नावं जाहीर

मुंबई : येत्या १२ जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपनं ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित बोरखे आणि योगेश टिळेकर यांनाही भाजपानं उमेदवारी दिली आहे.

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची संधी-

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे राजकारणातून दूर फेकल्या गेल्या होत्या. परंतु अलीकडच्या काळातील बदललेल्या राजकीय गणितांनंतर पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता.

सदाभाऊ खोत यांनाही संधी-

दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही विधानपरिषेदेची संधी देण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेची नेते राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेऊन सदाभाऊ खोत यांनी भाजपसोबत राहणं पसंद केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी-

शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर उद्या विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेनेतील फूटीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंची खंबीरपणे साथ दिली. संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे राहिले. त्याचंच बक्षीस त्यांना मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in