- अभय जोशी
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यातच भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात महायुती असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीतील विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी बुधवारी जाहीर केली. महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश असलेल्या या यादीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारुन त्यांची बहीण आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेल्या पंकजा यांचे राजकीय पुनवर्सन करण्यात आले आहे.
पंकजा आणि धनंजय या बहिण - भावांमध्ये कमालीची राजकीय कटुता आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेले बंड आणि शिवसेना (शिंदे) आणि भाजपा सोबतच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयाने अनेक राजकीय गणिते बदलली. धनंजय मुंडे यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली. एकीकडे पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय यांची राजकीय साठमारीतून खुबीने सुटका झाली आहे. कारण आता पंकजा एवढा मातब्बर उमेदवार परळी विधानसभा मतदारसंघात मिळणार नाही. त्यामुळे धनंजय यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक एकतर्फी होऊ शकते. पंकजा यांच्याविरुद्धचा सामना टाळण्यासाठी त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन ‘एका दगडात दोन पक्षी’ मारले गेले आहेत. पंकजा यांना उमेदवारी देताना अनेक राजकीय गणिते त्यामागे असू शकतात. कारण २०१४ आणि २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा आणि धनंजय यांच्यात चुरशीची लढत झाली होती. २०१४ मध्ये पंकजा यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी विजय खेचून आणत पंकजा यांना पराभवाची धूळ चाखली होती. त्यावेळी धनंजय यांना विजयाचे गणित जुळवण्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नेते संजय दौंड यांची समजूत घालावी लागली होती. त्यांना विधान परिषदेचे सदस्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दौंड यांनी धनंजय यांना पाठिंबा देऊन त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यानंतर संजय दौंड यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन त्यांचा मान राखला गेला होता.