

सोलापूर : पनवेलहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटीजवळ झालेल्या या अपघातात सहापैकी पाच जण जागीच ठार झाले आहेत.
एर्टिगा वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी साळवे (वय ६०), अर्चना तुकाराम भंडारे (४७), विशाल नरेंद्र भोसले (४१), अमर पाटील, आनंद माळी अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर देवडी पाटीजवळ हे मित्र कारमधून जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार मोठ्या झाडाला आदळली. कारमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. या भीषण अपघातात ३ पुरूष आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मोहोळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी ज्योती जयदार टकले या महिलेला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला. मृतदेह कारमध्ये चेंदामेंदा झालेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आले. कार हायवेपासून १० ते १५ फूट अंतरावर झुडुपांमध्ये अडकली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवण्यात आले असून पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक शेडगे करत आहेत.