पेपरफुटीला लगाम बसणार; या अधिवेशनात कठोर कायदा आणणार -फडणवीस

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी सकाळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी पेपरफुटीसंदर्भात निदर्शने केली.
पेपरफुटीला लगाम बसणार; या अधिवेशनात कठोर कायदा आणणार -फडणवीस
@bb_thorat
Published on

मुंबई : पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी याच अधिवेशनात कठोर कायदा आणणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील नवीन कायदा आणण्याबाबत सकारात्मक असून याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी एका शिष्टमंडळाने या प्रश्नी भेट घेतली असता, लवकरच कायदा आणणार, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अधिकारी गट ब व अराजपत्रित पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, रोहित पवार यांनी तारांकित प्रश्न केला असता, फडणवीस यांनी उत्तर दिले.

तलाठी भरतीत उत्तर चुकल्याने ती परीक्षा रद्द केली. या परीक्षेच्या व्यतिरिक्त पेपरफुटीबाबत एकच गुन्हा दाखल झाला आहे. त्याव्यतिरिक्त याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. सरकारने ७५ हजार भरतीची घोषणा केली होती. आमचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत ५७ हजार ४०० नियुक्ती आदेश दिले आहेत. त्याशिवाय ज्यांची परीक्षा पूर्ण झाली आहेत. मात्र काहींना नियुक्तीपत्र द्यायचे आहेत, तसे १९ हजार ८५३ जण आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ७७ हजार ३०५ जणांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. कुठल्याही घोटाळ्याविना आणि गैरप्रकाराविना ही प्रक्रिया पार पडली आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. त्याशिवाय ३१ हजार २०१ परीक्षेचा प्रक्रिया सुरू असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले. त्यामुळे विक्रमी वेळेत १ लाख जणांची भरती प्रक्रिया करण्याचा एकप्रकारचा विक्रम आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर भरती प्रक्रियेतील परीक्षा प्रक्रियेत यापुढे परीक्षा केंद्रावर उपजिल्हाधकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

...तर गुन्हा दाखल करणार

या चर्चेदरम्यान राज्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या पेपरफुटीचा हवाला देत आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. परंतु फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळले. “शहानिशा न करता तुम्ही जे व्हॉट‌्सॲप मॅसेज वाचून दाखवत आहात. त्यामुळे ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला, त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार,” अशी घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी!

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली‌. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केल्याने मंगळवारी कामकाज सुरू होण्याअगोदरच विधानभवन परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

logo
marathi.freepressjournal.in