

अमरावती : अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे. परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे.
पोलिसांनी आरोपीचे ५ मोबाईल फोन जप्त केले होते. या मोबाईल्समध्ये सर्व आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व चॅट्स होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ते डिलीट केले होते. स्थानिक पातळीवर हा डेटा रिकव्हर करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी हे पाचही मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले होते.
आरोपींच्या बँक खात्यांची, व्यवहारांचीही चौकशी
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, ३ मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाला आहे. त्यामुळे डिलीट केलेले व्हिडीओ व फोटो पुन्हा रिस्टोअर झाले आहेत. या रिकव्हर डेटाच्या मदतीने आता पोलिस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच या प्रकरणी आणखी काही तरुणींची फसवणूक झाली आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणी आरोपींच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे.
नेमके काय आहे परतवाडा प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल करण्यात आल्याचे गंभीर गुन्हे घडल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद नामक मुख्य आरोपीसह इतर काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने सोशल मीडियाच्या मदतीने पीडित तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. त्यांचे अश्लील व्हिडीओ व फोटोही व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींची चौकशी सुरू केली आहे.