आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

कुटुंबीयांनी तो मी नव्हेच असाच पवित्रा घेत अज्ञातांनी खून केल्याचा बनाव केला होता, मात्र...
आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

कराड : माण तालुक्यातील शिरवली येथे एका व्यक्तीचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र कुटुंबीयांनी तो मी नव्हेच असाच पवित्रा घेत अज्ञातांनी खून केल्याचा बनाव केला होता, मात्र पोलीस तपासात मुलाच्या दारू पिण्याच्या तसेच त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनी मुलगी व नातवाच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

दादा रामचंद्र जगदाळे असे मृताचे नाव असून याप्रकरणी मयत व्यक्तीचे वडील रामचंद्र ज्ञानू जगदाळे, आई कुसुम रामचंद्र जगदाळे, बहिण शैला सचिन जाधव आणि अल्पवयीन पुतण्या अशांनी संगनमताने खून केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

माण तालुक्यातील शिरवली गावातील भवानी नगरमध्ये पहाटेच्या सुमारास कुत्रांच्या भूकण्याच्या आवाजामुळे मृताचे वडील घराबाहेर आले असता त्यांना आपला मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्यावेळी तिथून चार ते पाच लोक पळून गेले असल्याचे सांगत कुटुंबीयांनी खुनाचा थोटा बनाव रचला. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता कुटुंबीयांकडून माहिती घेतली असता, त्यांचे सांगणे व घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.

याबाबत अधिक तपास केला असता मयत व्यक्ती हा दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे, शिव्या देणे व वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यावर संशय घेणे तसेच दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून पुतण्याला आणि वहिनीला मारून टाकण्याची धमकी देत असे. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनी आपली मुलगी व मयताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यासोबत संगनमत करून दादा रामचंद्र जगदाळे हा दारू पिऊन घरी येऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून व हातपाय पकडून दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.

याप्रकरणी मयत व्यक्तीचे वडील रामचंद्र ज्ञान जगदाळे, आई कुसुम रामचंद्र जगदाळे, मयताची बहिण शैला सचिन जाधव आणि मयताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in