परळीत शिंदेसेना- ‘एमआयएम’ युती; ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणणाऱ्या शिंदेंनी बोलणे टाळले

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका करत त्यांची साथ सोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’शी हातमिळवणी केली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेत शिंदेसेना आणि ‘एमआयएम’ची युती झालेली आहे.
परळीत शिंदेसेना- ‘एमआयएम’ युती
परळीत शिंदेसेना- ‘एमआयएम’ युती
Published on

बीड : अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम या परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांची युती झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विचित्र युती झाली आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका करत त्यांची साथ सोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’शी हातमिळवणी केली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेत शिंदेसेना आणि ‘एमआयएम’ची युती झालेली आहे. पुण्यात असलेल्या शिंदे यांना परळीतील या घडामोडींविषयी विचारले असता, कोण एमआयएम? असा प्रतिसवाल त्यांनी केला व दोन शब्द बोलून शिंदे निघून गेले. त्यांनी फार काही बोलणे टाळले.

अकोट नगरपालिकेत एमआयएम आणि भाजपने केलेली युती आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ ताजी असताना आता बीडच्या परळी नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने ‘एमआयएम’ सोबत हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिंदेसेनेसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील येथे ‘एमआयएम’ सोबत युती केली आहे. परळी नगरपालिकेत शिंदेसेना, एमआयएम आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र आली व त्यांनी भाजपला आहे.

भाजपचा स्वतंत्र गट कायम

परळी नगरपालिकेत वेगळीच सत्ता समीकरणे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली. नव्याने स्थापन झालेल्या गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १६, शिंदेसेनेचे २, एमआयएमचा १ आणि ४ अपक्षांचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजपने आपला स्वतंत्र गट कायम ठेवला आहे. शिंदेसेनेने एमआयएमशी युती केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला.

सत्तेसाठीच सारे काही...

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे यांचे सरकार कोसळले. काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती करत ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, अशी टीका करत शिंदे यांनी बंड केले होते. त्यांना या बंडात ४० आमदारांनी साथ दिली. पुढे पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरे यांच्याकडून गेले. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने त्यांची साथ सोडणारे शिंदे यांचाच पक्ष आता एमआयएम सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात सत्तेसाठी सारे काही, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in