राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर शनिवारी बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानी पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेटसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर शनिवारी बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानी पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन सर्व राजकीय मतभेद आणि गैरसमज दूर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही दिवसभरातील उलटसुलट वृत्तांमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम आहे.

या राजकीय घडामोडींची सुरुवात शनिवारी सकाळी झाली, जेव्हा सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, पार्थ पवार तातडीने गोविंदबागेत दाखल झाले. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजीत पवार असे संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. सुमारे दीड ते दोन तास ही बैठक चालली.

अजित पवारांचे स्वप्न साकार करण्याचा पवार कुटुंबाचा निर्धार

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी किरण गुजर यांनी या बैठकीबाबत बोलताना सांगितले की, अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत साकार करण्याचा निर्धार पार्थ पवार आणि कुटुंबाने केला आहे. पार्थ पवार यांनी शरद पवारांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले असून, विलीनीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जानेवारी महिन्यातच विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती, मात्र अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर या प्रक्रियेला गती आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in