मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहितीही समोर आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार पार्थ पवार हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर ८८.३ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे दिसून येते.
अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवार यांचे नातू असलेल्या पार्थ पवार यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा प्रलंबित नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना एकूण मालमत्ता १०.८ कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात दर्शविले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ८८.३ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच सुमारे ९२ लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. पार्थ यांच्या मालमत्तेमध्ये २ कोटी रुपयांचे दिलेले कर्ज, २.११ कोटी रुपयांची बँक ठेव, तसेच २.५ कोटी रुपयांचे शेअर्स, बाँड्स, जमीनजुमल्याचा समावेश आहे.
भाजपचे ७२ वर्षीय रामराव वडकुते हे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ उमेदवार असून त्यांची एकूण मालमत्ता ५.६ कोटी रुपये आहे. भाजपच्या माया ईवनाते यांनी ३.८ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली असून काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिका निवडणुकीत त्यांनी जवळपास इतकीच मालमत्ता दाखवली होती.
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ८.९ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. २०२० मध्ये त्यांची मालमत्ता ६.४ कोटी रुपये होती. जी मागील सहा वर्षांत त्यांची मालमत्ता ३८ टक्क्यांनी वाढली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावावर सर्वात कमी मालमत्ता असून त्यांनी आपल्याकडे ५९ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पार्थ यांचे आजोबा आहेत. राष्ट्रवादी (शप) चे शरद पवार यांनी ६०.७१ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली आहे, तर सर्वात कमी मालमत्ता डॉ. ज्योती वाघमारे यांची आहे.