"पार्थ, तुझ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हा भाऊ लढतोय", रोहित पवारांचा टोला

ज्या बारणेंमुळे पार्थ पवारांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांचाच अजित पवार प्रचार करत असल्याने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
"पार्थ, तुझ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हा भाऊ लढतोय", रोहित पवारांचा टोला

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघात पाच वर्षापूर्वी श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आता पाच वर्षानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली असून अजित पवार हे महायुतीत सामील झालेत. महायुतीकडून मावळ मतदारसंघातून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे उभे आहेत, तर खुद्द अजित पवारच यावेळी बारणेंचा प्रचार करत असल्याचे चित्र दिसतंय.

ज्या बारणेंमुळे पार्थ पवारांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांचाच अजित पवार प्रचार करत असल्याने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. मावळमध्ये पोहोचल्यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, 'पार्थ तुझ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आम्ही अजूनही लढत आहोत', असे म्हणत रोहित पवारांनी जोरदार टोला हाणलाय.

...म्हणून त्यांना (अजितदादा) या गोष्टी कराव्या लागतायेत

मावळमध्ये अजित पवार हे पार्थ पवार यांचा पराभव करणारे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, "अजित पवार हे शरद पवारांना वडील मानायचे. वडिलांना सोडून ते आता भाजपमध्ये गेले. का गेले? त्यांचं व्यक्तिगत साम्राज्य टिकवायचं होतं, कारवाया थांबवायच्या होत्या. २०१९ ला येथील सर्व कार्यकर्त्यांनी पार्थचा प्रचार केला, मी सुद्धा फिरलो होतो. पण दुर्दैवाने या निवडणुकीत पार्थ मोठ्या फरकाने पडला. ती गोष्ट अजूनही आमच्या डोक्यात आहे. त्यावेळी आम्ही प्रचार बारणेंविरोधात केला, आताही त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय. पण, काल बारणेंचा फॉर्म भरण्यासाठी पार्थचे वडील म्हणजे अजितदादा इथे आले होते म्हणजे ते बऱ्याच काही गोष्टी विसरून गेलेत", असे ते म्हणाले. पार्थचा पराभव पचला का या प्रश्नाचं उत्तर देताना, पचनी नाही पडला पण त्यांना (अजितदादांना) इतर अनेक गोष्टी पचवायच्या आहेत, म्हणून या गोष्टी कराव्या लागतायेत, अशी खरमरीत टीका रोहित यांनी केली.

तुझ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अजूनही लढतोय-

मला पार्थला इतकंच सांगायचंय, हा भाऊ तुझ्यासाठी, तेव्हा तुझा जो पराभव झाला होता त्याच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने प्रचार करण्यासाठी, बारणेंच्या विरोधात प्रचारासाठी येथे आला आहे. जे कार्यकर्ते...मलिदा गँग नाही (ती गँग अजितदादांकडे गेली आहे, कार्यकर्ते इथेच आहेत) तुझा जो पराभव झाला होता, त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही अजूनही लढत आहोत. कारण, आम्ही भूमिका बदलत नाहीत, त्यामुळे तू निश्चित रहा, आम्ही तुझ्यासाठी लढत आहोत, असे म्हणत रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना त्यांच्या पराभवाची आठवण करून दिली.

भाजपच्या दबावामुळे बारामतीतून उमेदवारी मागे घेतली नाही -

"बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या नावाची मविआकडून आधीच घोषणा झाली होती. महायुतीकडून १५ दिवसांनंतर काकींच्या (सुनेत्रा पवार) नावाची घोषणा झाली. सुरूवातीला सुप्रिया ताईंच्या नावाची घोषणा झाल्यामुळे माघार घेण्याचा चान्स दादांकडे होता. पण त्यांनी माघार घेतली नाही. भाजपच्या दबावामुळे त्यांनी नाव मागे घेतले नाही. कारण ते आता भाजपचं खूप ऐकायला लागले आहेत. अशा परिस्थितीत दादांनीच तो निर्णय (पवार वि. पवार) करण्याचा तिथे घेतला. तर तो त्यांचा त्यांचा निर्णय आहे, पण हे आता लोकांना कळलेलं आहे. लोकं नक्कीच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या पाठीमागे, सुप्रिया ताईंच्या मागे उभे राहून त्यांनाच किमान तीन साडेतीन लाख मतांच्या फरकाने निवडून देतील", असे रोहित पवार म्हणाले. बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाल्याचा फटका बसणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in