मुंबई विमानतळावर प्रवाशांची व सामानाची तपासणी होणार झटपट

प्रवाशांच्या सामानाच्या तपासणीसाठी दर तासाला ३५० ट्रे स्वयंचलित पद्धतीने फिरतील. या कामात प्रवासी किंवा कर्मचारी यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होणार नसल्याची माहिती
मुंबई विमानतळावर प्रवाशांची व सामानाची तपासणी होणार झटपट

प्रवाशांची तपासणी प्रक्रिया झटपट व्हावी आणि त्यात अधिक शिस्तबद्धता यावी यासाठी मुंबई विमानतळावरील टर्मिनल २ वर देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय प्रवाशांसाठी एकात्मिक सुरक्षा तपासणी प्रवेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी ई-प्रवेशद्वार आणि ‘स्वयंचलित ट्रे रिट्रिव्हल यंत्रणा’ (एटीआरएस) बसविण्यात आली आहे. प्रवाशांच्या सामानाच्या तपासणीसाठी दर तासाला ३५० ट्रे स्वयंचलित पद्धतीने फिरतील. या कामात प्रवासी किंवा कर्मचारी यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या यंत्रणेद्वारे प्रती तास सरासरी २८० प्रवाशांची सुरक्षा तपासणी होणार असल्याचेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही प्रवाशांसाठीच्या सुरक्षा प्रवेश तपासणीसाठी चेक-इन प्रक्रियेमध्ये अधिक शिस्तबद्धता आणण्यासाठी एकात्मिक सुरक्षा तपासणी प्रक्रियेत काही बदल करण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी एकात्मिक सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी यावे लागणार. यापूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवाशांसाठीची सुरक्षा तपासणी टर्मिनल २ वरील अनुक्रमे श्रेणी-३ आणि श्रेणी- ४ वर केली जात होती. आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही प्रकारचे प्रवासी सुरक्षा तपासणी स्थळी पाच वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या ई-प्रवेशद्वारापैकी एकामधून आणि त्यानंतर पुढील सुरक्षा तपासणीसाठी बसविलेल्या दुसऱ्या ई-प्रवेशद्वारातून पुढे आपापल्या मार्गाने जातील. हे बदल करतानाच स्वयंचालित ट्रे रिट्रिव्हल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे प्रवाशांनी आपले सामान घेतल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने ट्रे पुन्हा मूळ जागी जातील. यामुळे प्रवाशांच्या सामान तपासणीच्या प्रक्रियेस लागणारा वेळ कमी होईल, शिवाय या कामात प्रवासी किंवा कर्मचारी यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेपही होणार नाही. ही यंत्रे बसविल्यामुळे ट्रे मिळविण्यासाठी वाट पाहण्याचा, शोधाशोध करण्यासाठी प्रवाशांना होणारा त्रासही संपुष्टात येईल. या यंत्रणेमुळे उपलब्ध ट्रे सातत्याने फिरत राहणार आहेत. त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळे प्रती तास सरासरी २८० प्रवाशांची सुरक्षा तपासणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in