बारामती : यंदा आम्ही तरुण पिढीच्या हातात सत्ता देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी युगेंद्र यांची निवड केली आहे. त्याची लोकांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे. काही लोक म्हणतात, मी काय करू? मग त्याला मी तरी काय करू? असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.
१९६७ साली मी आमदार झालो. २० वर्षे मी आमदार, मुख्यमंत्रीपदे भूषवली. त्यानंतर नवी पिढी आणावी, असा विचार केला आणि अजित पवारांना आणले. ३०-३५ वर्षे त्यांनी बघितले. ३ वेळा उपमुख्यमंत्री केले. आता पुढे युगेंद्र यांची नवी पिढी राहणार आहे. आता युगेंद्र पवारांना संधी द्यावी. बारामतीचा नावलौकिक आज देशभरात आहे. ही परंपरा पुढे कायम राहावी, यासाठी मतांचा विक्रम करावा. बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही ५० वर्षे काम केले, त्याहीपेक्षा अधिक जोमाने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्र पवारमध्ये आहे, असा मी शब्द देतो, असे शरद पवार म्हणाले.
मोदींचा घटना बदलण्याचा प्रयत्न देशासाठी घातक
नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये सुधार करण्यासाठी ४०० खासदारांची आवश्यकता होती. देशाचा कारभार करायचा असेल, तर चारशे खासदारांची आवश्यकता नाही. २५० ते ३०० खासदारांमध्ये ते काम होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या घटनेत काही बदल करायचा असेल, तर ४०० आकड्याची आवश्यकता असते. यावरून हे स्पष्ट होते की, नरेंद्र मोदींचा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा. मात्र, ते देशासाठी घातक होते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय!
बारामतीतील शरद पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या. यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातातील एका फलकाची जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेला फलक प्रतिभा पवारांनी आपल्या हाती घेतला. या फलकावर लिहिलेल्या मथळ्याने सर्वांच लक्ष वेधून घेतले. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, असा मथळा त्या फलकावर लिहिला होता. एका कार्यकर्त्याने बनवून आणलेला हा फलक प्रतिभा पवार यांनी त्यांच्या हातात घेऊन उंचावला. या आगळ्या फलकाची बारामतीत जोरदार चर्चा आहे.