व्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये मोजा, महाराष्ट्र सरकारकडून किमतीत वाढ

राज्य सरकारने व्हीआयपी नंबरसाठीच्या किमतीत वाढ केली असून त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.
व्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये मोजा, महाराष्ट्र सरकारकडून किमतीत वाढ
Published on

कमल मिश्रा / मुंबई

जर तुम्हाला तुमच्या वाहनांसाठी व्हीआयपी, फॅन्सी आणि आपल्या पसंतीचा वाहन क्रमांक हवा असल्यास, त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी ठेवा. राज्य सरकारने व्हीआयपी नंबरसाठीच्या किमतीत वाढ केली असून त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

वैयक्तिक अथवा व्यावसायिक वाहनांसाठी हे नवीन दर वेगवेगळे असतील. दुचाकी, तीनचाकी आणि अन्य वाहनांसाठी नवीन दर लागू करण्यात आले आहेत. ‘०००१’ या नोदणी क्रमांकाला मुंबई, पुणे आणि अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठी मागणी असून त्यासाठी ५ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्याचबरोबर या अधिसूचनेनुसार, मालिकेबाहेरील व्हीआयपी क्रमांक मोजण्यासाठी मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात आता १८ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजेच व्हीआयपी नंबरसाठीच्या किमतीत एक चांगल्या दर्जाची नवीन कार घरी येऊ शकते.

वाहतूक विभागाने ३० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘०००१’ या क्रमांकासाठीची किंमत ३ लाखांवरून ५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. मात्र या क्रमांकासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या शहरात मोठी मागणी असल्यास, हाच नंबर ६ लाख रुपयांत मिळू शकतो. टू-व्हिलर आणि थ्री-व्हिलरसाठी हाच नंबर ५० हजार ते १ लाख रुपयांत मिळू शकतो. मात्र या मालिकेतील ‘०००१’ हा नंबर उपलब्ध नसल्यास किंवा अन्य मालिकेतून हा नंबर हवा असल्यास, त्यासाठी चारचाकी वाहनांकरिता १५ लाख रुपये, तर टू-व्हिलर आणि थ्री-व्हिलरसाठी ३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने २४० व्हीआयपी नंबरच्या नोंदणीत वाढ केली आहे. ०००९, ००९९, ०९९९, ९९९९ आणि ०७८६ हा क्रमांक आता चारचाकी वाहनांसाठी २.५ लाख रुपयांना उपलब्ध होईल. पूर्वी या क्रमांकासाठी १.५ लाख रुपये आकारले जात होते. तसेच या क्रमांकासाठी आता दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना २० हजारांवरून थेट ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

१६ लोकप्रिय क्रमांकासाठीही आता १ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच ००११, ००२२, ००८८, ०२००, ०२०२, ४२४२, ५६५६ आणि ७३७४ या क्रमांकासाठी आता चारचाकी वाहनांसाठी ७० हजार, तर टू-व्हिलर आणि थ्री-व्हिलरसाठी १५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हीआयपी क्रमांक हस्तांतरित करता येणार

अनेक धनाढ्य व्यक्ती, श्रीमंत उद्योजक, राजकारणी तसेच सेलिब्रेटींकडून आपल्या लक्झरी गाड्यांसाठी व्हीआयपी नंबरला मोठी मागणी असते. त्यामुळे राज्य सरकारने आता व्हीआयपी क्रमांक आपल्या कुटुंबीयांना हस्तांतरित करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे हा क्रमांक आता पत्नी, मुले किंवा मुलगी यांना हस्तांतरित करता येऊ शकतो. पूर्वी अशा हस्तांतरणावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

व्हीआयपी क्रमांकाचा वाढता ट्रेंड

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर प्लेटसाठीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अद्वितीय नंबर प्लेटमुळे रस्त्यांवर वाहनांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. या नंबर प्लेटमुळे वाहनमालकांचे स्टेटस सिम्बॉल तसेच व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते. नंबर प्लेटमधून राज्य शासनाला १३९.२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in