Payal Gaming MMS Case : महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई, आरोपींनी जाहीर माफीही मागितली - Video

लोकप्रिय युट्यूबर पायल गेमिंग (Payal Gaming) हिच्याशी संबंधित कथित डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह फेक व्हिडिओ सर्वप्रथम अपलोड करणाऱ्याचीही ओळख पटवण्यात आली असून लवकरच त्याच्यावरही कारवाई केली जाईल.
Payal Gaming MMS Case : महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई, आरोपींनी जाहीर माफीही मागितली - Video
Published on

मुंबई : लोकप्रिय युट्यूबर पायल गेमिंग (Payal Gaming) हिच्याशी संबंधित कथित डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांना नोटिसा बजावून जाहीर माफी मागायला लावण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबरने रविवारी दिली.

महाराष्ट्र सायबरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. “आक्षेपार्ह डीपफेक कंटेंट अपलोड आणि प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला असून काहींना ताब्यात घेऊन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांनी सार्वजनिक माफीदेखील मागितली आहे. आक्षेपार्ह फेक व्हिडिओ सर्वप्रथम अपलोड करणाऱ्याचीही ओळख पटवण्यात आली असून लवकरच त्याच्यावरही कारवाई केली जाईल,” असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आरोपींनी जाहीर माफीही मागितली

तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत महाराष्ट्र सायबरने पोस्टसोबत संबंधित आरोपींचे फोटो आणि त्यांच्या माफीचे व्हिडिओही शेअर केले आहेत. माफी मागणाऱ्या आरोपींपैकी अभिषेक नावाचा एक तरुण इन्स्टाग्रामवर व्हिडिओची लिंक शेअर केल्याबद्दल माफी मागताना दिसतो. पडताळणी न करता लिंक शेअर केल्याने पायल गेमिंगच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे त्याने मान्य केले. महाराष्ट्र सायबरकडून समुपदेशनानंतर चूक लक्षात आली असून भविष्यात असे पुन्हा करणार नाही, असेही त्याने सांगितले.

व्हायरल व्हिडिओ नेमका काय होता?

गेल्या महिन्यात एका जोडप्याचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील तरुणी पायल गेमिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अनेक नेटकऱ्यांनी पायलच्या बाजूने भूमिका घेत हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केलेला डीपफेक असल्याचा संशय व्यक्त केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पायल गेमिंगने स्पष्टीकरण देत, व्हिडिओतील व्यक्ती आपण नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही जाहीर केले होते.

logo
marathi.freepressjournal.in